नवी दिल्ली - पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार सोहळा सोमवारी आयोजित केला गेला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या देशभरातील निवडक मुलांना यावळी सन्मानित करण्यात आले. या मुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने सन्मानित केले. या मुलांना प्रमाणपत्र आणि एक लाख रुपये बक्षीस देण्यात आले. या पुरस्कार प्राप्त मुलांमध्ये सिसरामधील डबलाली येथील तनिश याचाही पंतप्रधानांकडून सन्मान झाला.
सन्मानित झालेल्या तनिशने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची आपली इच्छा होती. मात्र आज पंतप्रधानाची भेट होऊ शकली नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावतीने मला सन्मानित करण्यात आले. ही अभिमानाची बाब आहे. त्याने नऊ प्रकारचे अॅप बनवले आहेत. कोरोना आल्यानंतर पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी लोकांसमोर निर्माण झालेल्या समस्यांचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारचे अॅप तयार केले. तसेच माझ्या पशुमॉल अॅपचा उपयोग देशभरातील सुमारे १५ हजार शेतकरी करत आहेत.
लॉकडाऊनमध्ये प्राण्यांचे बाजार बंद होते. त्यामुळे व्यापारी त्यांच्याकडील प्राणी विकू शकत नव्हते. ती बाब विचारात घेऊन तनिशने अॅप विकसित केले. दरम्यान मुलांनी मोबाईलचा कमीत कमी वापर करावा. तसेच केवळ चांगल्या कामासाठीच मोबाईल वापरावा, असे आवाहन त्याने मुलांना केले आहे. दरम्यान, तनिशच्या वडिलांनी मुलाचा सन्मान झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्याने वेगवेगळ्या बाबींसाठी उपयुक्त अशी ९ प्रकारची अॅप बनवल्याचे सांगितले.
दरम्यान, बरनाला रोड येथील लघू सचिवालयामध्ये झालेल्या कार्यक्रमान तनिशला सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमामध्ये उपायुक्त अनिश यादव यांच्यासह पुरस्कार मिळालेला तनिश आणि त्याचे कुटुंबीय सहभागी झाले होते. अनिश यादव यांनी तनिश याला ऑनलाईन सर्टिफिकेट आणि एक लाख रुपयांची बक्षीस रक्कम ऑनलाईन पद्धचीने सुपुर्द केली.