ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. ६ - काँग्रेसच्या नऊ आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आसाम विधानसभा निवडणुकीला अद्याप सात महिने बाकी असले तरी राज्यात आत्तापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागले असून त्या पार्श्वभूमीवर नऊ आमदार भाजपात गेल्याने काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.
भाजपात सामील झालेल्या या नऊ जणांपैकी चार आमदारांना गेल्या महिन्यात काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते तर पाच जणांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बंडखोरी आणि पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने या आमदारांना बडतर्फे केले होते.
बोलिन चेतियास प्रदान बरूआ, पल्लव लोचन दास, राजन बोरठाकूर, पीयुष हजारिका, कृपानाथ मल्लाह अबू ताहेर बेपारी, बिनंदा सैकिया आणि जयंत मल्लाह बरूआ अशी त्यांची नावे असून ते हेमंत विश्व शर्मा यांच्या गटाशी निगडीत असल्याचे समजते. शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपात प्रवेश केला होता.