मुंबई: वातावरणातील बदलांचे भीषण परिणाम भविष्यात दिसून येणार आहेत. देशातील ९ कोटी नागरिकांवर उपासमारीचं संकट कोसळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेनं आपल्या अहवालातून धोक्याचा इशारा दिला आहे. २०३० पर्यंत ९ कोटी भारतीयांना उपासमारीचा सामना करावा लागेल, असं आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेनं अहवालात म्हटलं आहे.
येणाऱ्या ७०-८० वर्षांत धान्यांचं उत्पादन कमी होईल. उष्णतेच्या लाटांचं प्रमाण कैकपटीनं वाढेल, असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. वातावरणातील बदलांमुळे २०३० पर्यंत देशातील ९ कोटींहून अधिक लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल. सर्वसामान्य परिस्थितीत हा आकजा ७.३९ कोटी असता, पण वातावरणातील बदलांमुळे हा आकडा २३ टक्क्यांनी वाढेल, अशी आकडेवारी अहवालात आहे.
२०३० पर्यंत कॅलरी ग्रहण करण्याचं प्रमाण होईल. सामान्य परिस्थितीत एक व्यक्ती दिवसाकाठी २ हजार ६९७ कॅलरी ग्रहण करतो. वातावरणातील बदलांमुळे हाच आकडा २ हजार ६५१ वर येईल. वातावरणातील उत्पादनाचा परिणाम खाद्य उत्पादनावरही होईल. धान्य, फळं, भाज्या, तेलबिया, डाळी, मांस यांचं उत्पादन कमी होईल. २१०० पर्यंत देशाचं तापमान २.४ अंश सेल्सिअस ते ४.४ अंश सेल्सिअसनं वाढेल. उष्णतेच्या लाटांचं प्रमाण तिप्पट ते चौपट होईल.
तापमान वाढीचा परिणाम धान्यांच्या उत्पादनावर होईल. २०४१ ते २०६० च्या दरम्यान उत्पादन १.८ ते ६.६ टक्क्यांनी घसरेल. २०६१ ते २०८० च्या दरम्यान धान्य उत्पादनात ७.२ ते २३.६ टक्क्यांची घट होईल. हरित वायूंचं उत्सर्जन कमी करण्यासाठी वायव्य भारतात तांदळाऐवजी इतर धान्यांचं उत्पादन घेण्यात यावं असा सल्ला देण्यात आला आहे.