मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वडिलांच्या निधनानंतर 9 मुलींनी मुलाचं कर्तव्य पार पाडत मुखाग्नी दिला. हे दृश्य पाहून सर्वांचे डोळे पाणावले. या मुलींनी फक्त अंत्यसंस्कारच केले नाहीत, तर वडिलांच्या पार्थिवाला खांदा देखील दिला. स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार केले. हे दृश्य पाहून काही लोक रडायला लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस एएसआय हरिश्चंद्र अहिरवार हे वॉर्ड क्रमांक 17 मधील 10व्या बटालियन भागातील रहिवासी होते. ब्रेन हॅमरेजमुळे सोमवारी त्यांचं निधन झालं. हरिश्चंद्र यांना नऊ मुली आहेत. मुलगा नाही. हरिश्चंद्र यांनी मुलाप्रमाणेच आपल्या सर्व मुलींना वाढवलं. 7 मुलींचं लग्न केलं. आता त्याच मुलींनी मुलाचं कर्तव्य पार पाडलं.
मुलींनी वडिलांना खांदा दिला आणि इतर विधी पार पाडले. 7 मुली विवाहित आहेत तर मुली रोशनी आणि गुडिया अविवाहित आहेत. मुलगी वंदनाने सांगितले की, वडिलांचं मुलींवर खूप प्रेम होतं. आम्हाला एकही भाऊ नाही, त्यामुळे सर्व लहान आणि मोठ्या बहिणींनी (अनिता, तारा, जयश्री, कल्पना, रिंकी, गुडिया, रोशनी आणि दुर्गा) मिळून मुलाचं कर्तव्य पार पाडायचं ठरवलं.
आमचे वडीलच आमच्यासाठी सर्वकाही होते असं देखील मुलींनी म्हटलं आहे. बुंदेलखंडमध्ये मुली आणि महिलांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे. पण आता समाजातील जुन्या परंपरा आणि समजुती मोडून लोक पुढाकार घेत असलेलं पाहायला मिळत आहे. अशाप्रकारे मुलींनी वडिलांवर अंत्यसंस्कार केले असून नवा आदर्श निर्माण केला आहे.