पाटणा : उंदरानं कुरतडल्याच्या कारणामुळे एका नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हे बाळ केवळ नऊ दिवसांचंच होतं. बिहारमधील दरभंगा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील (डीएमसीएच) हा संतापजनक प्रकार आहे. हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून मात्र हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळ गंभीर स्वरुपात आजारी असल्याच्या कारणामुळे त्याला डीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या या 9 दिवसांच्या बाळाला उंदरानं कुरतडलं आणि यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बाळाच्या वडिलांनी सांगितले की, उशिरा रात्री 1 वाजेपर्यंत बाळाची प्रकृती पूर्णतः ठीक होती. मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्याला पाहण्यासाठी गेलो असता, त्याचे हात आणि पाय उंदरानं कुरतडल्याचं दिसले आणि बाळ मृतावस्थेत होतं. नर्स आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे, डॉ. ओमप्रकाश यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. बाळाची प्रकृती गंभीर असल्याच्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
याप्रकरणी पीडित कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे. दरभंगाचे प्रभारी जिल्हाधिकारी कारी प्रसाद यांच्याकडे तक्रारीचा अर्ज सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी समिती गठित करुन कारवाई करण्यात येईल,असे आश्वासन पीडित कुटुंबीयांना देण्यात आले आहे.