हैदराबाद: सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हैदराबादमध्ये संरक्षक भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका २ महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. सध्या दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्यानं बचावकार्यात अडथळे येत आहेत. कोसळलेल्या भिंतीखाली काही जण अडकले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.हैदराबादच्या मोहम्मदिया परिसरात संरक्षक भिंत काही घरांवर कोसळली. रात्री उशिरा ही घटना घडली. यामध्ये ९ जणांनी जीव गमावला आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरुवात झाली. पावसाचा जोर जास्त असल्यानं परिसरात पाणी साचलं आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींनी ट्विट करून घटनेची आणि मदतकार्याची माहिती दिली. 'मुसळधार पावसामुळे बंदलागुडातल्या मोहम्मदिया हिल्स परिसरातली भिंत कोसळली आहे. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत,' असं ट्विट ओवेसींनी केलं आहे.
हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळून ९ जणांचा मृत्यू; मृतांमध्ये २ महिन्यांचं बाळ
By कुणाल गवाणकर | Published: October 14, 2020 8:31 AM