मुंबई : राज्यात मंगळवारी कोव्हिशिल्डचे नऊ लाख डोस येतील, असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. १५ मेपर्यंत आणखी ९ लाख डोस येतील. एकूण १८ लाख डोस एक महिन्यासाठी येतील, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे राज्यात काही निवडक शासकीय, पालिका केंद्रांवर दुसऱ्या डोससाठी येणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
१ मेपासून १८ वर्षे ते ४४ वर्षे वयाच्या लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी तीन लाख लसींचे डोस महाराष्ट्राला मिळाले होते. तेच डोस रोज थोडे थोडे देणे सुरू आहे. ४५ वर्षे वयाच्या लोकांसाठी लस आलेली नसल्यामुळे त्यांच्यासाठीचे लसीकरण बंद पडले आहे. ४५ वर्षांवरील लोकांसाठी केंद्र सरकार लस पुरवणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यासाठी साठा राज्यात कुठेही उपलब्ध नाही, त्यामुळे हे लसीकरण पूर्णपणे बंद पडले आहे. महाराष्ट्रात ४,१०० लसीकरण केंद्रे उघडण्यात आली होती. त्यापैकी ३,५०८ केंद्रे लसीअभावी बंद करण्यात आली आहेत. रविवारी फक्त ५९२ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. त्यातही भारत बायोटेकची लस दुसऱ्या डोससाठी गरजेची असताना त्याचा पुरवठा कधी आणि किती होईल, याविषयी अद्याप स्पष्टता नाही. दुसरा डोस घेण्यासाठी कोविन ॲपवर तारीख उपलब्ध होत नाही. त्यामुळे ती लस घेणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हे सगळे लोक ४५ वर्षांवरील आहेत. दुसरा डोस घेण्यासाठी सरकारने वेगळी व्यवस्था करावी, अशी मागणी खासगी हॉस्पिटल्स तसेच सरकारी व्यवस्थेतील अनेक वरिष्ठांनी केली आहे. मात्र ही वस्तुस्थिती सरकारसमोर गेली पाहिजे, असेही सांगितले.