गुवाहाटी : आसामच्या २३ जिल्ह्यांतील ९.२६ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या जोरदार पावसानंतर आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २२ मेपासून झालेल्या भूस्खलनात अन्य २३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पूर्वाेत्तरमधील बहुतांश नद्यांना पूर आला असून, यात ब्रह्मपुत्राचाही समावेश असून, ही नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.
आसाममधील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या राज्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे त्यात धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, उदलगुरी, दरांग, नलबाडी, बारपेटा, कोकराझार, धुबरी, नौगाव, गोलाघाट, जोरहाट, माजुली, शिवसागर, दिबु्रगड, बोंगईगाव, यांचा समावेश आहे.
या जिल्ह्यातील २०७१ गावांना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली, तसेच राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.68,806 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसानएका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगण्यात आले की, या पुराचा ९.२६ लाख लोकांना फटका बसला असून, ६८,८०६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 193 आश्रय शिबिरांत सध्या २७ हजारांहून अधिक लोक राहत आहेत. राज्य आपत्कालीन व्यवस्थापनाचे पथक, एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासन पूरग्रस्तांना मदत करीत आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करून पूरग्रस्त भागांना मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत.