नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एका ट्रक आणि कारची धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील हायवेवर हा भीषण अपघात झाला. एत्मादपूर येथून येणारी एक कार डिव्हायडरला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडली. त्याचवेळी रामबाग येथून एक कंटेनर येत होता. याच दरम्यान या दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत त्यांना मदतीचा हात दिला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नऊ जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान काहींचा मृत्यू झाला आहे. तसेच कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढताना काही अडचणींचा सामना करावा लागला. तसेच प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.