संजय शर्मा
नवी दिल्ली : चीन-भारत सीमेवरील तणाव कमी होत नसल्याने तसेच चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) मोठ्या संख्येने सैन्य कायम ठेवल्याने भारतानेही तयारीचा भाग म्हणून चीन सीमेजवळ आयटीबीपीचे जवळपास आणखी ९ हजार सैनिक तैनात केले आहेत. बुधवारी मंत्रिमंडळाने यासाठी मंजुरी दिली. ९ हजार सैनिकांसाठी सात नवीन बटालियन आणि नवीन सेक्टर हेडक्वार्टर उभारण्यात येणार आहेत.
लेह, लडाखसाठीचा तिसरा रस्ता कमी वेळेत व कमी अंतरात लडाखपर्यंत घेऊन जाणार आहे. या मार्गावरील शिंकुला बोगद्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ४.१ किलोमीटर लांबीच्या बोगद्यामुळे या मार्गाने सर्व मोसमात जाणे-येणे शक्य होणार आहे. जोजीला बोगदा बनवल्यामुळे वेळ व अंतर वाचणार आहे. दुसरा रस्ता मनालीच्या अटल बोगद्यामार्गे लेह लडाखपर्यंत जाणारा आहे. आता तिसऱ्या पर्यायी रस्त्याची उभारणी केल्यानंतर लष्करी सामग्री नेणे-आणणे सोपे होणार आहे.
विशेष म्हणजे भारत-चीन सीमेवर सतत निर्माण कार्य केले जात आहे. अक्साई चीन सीमेमध्ये चीन रेल्वेमार्ग उभारत आहे व तो २०२५ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षेला मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. चीन सीमेवर भारत पायाभूत सुविधी, रस्त्यांचे जाळे, माहिती तंत्रज्ञान व सुरक्षा मजबूत करत आहे.
सध्याच १ लाखापेक्षा जास्त सैनिक तैनातभारत-चीन सीमेवर चीनच्या चिथावणीखोर कृत्यांमुळे भारताने यापूर्वीच एक लाखपेक्षा जास्त सैनिक पूर्व लडाखमध्ये तैनात केलेले आहेत. चिनी सीमेवर निगराणी करण्यासाठी अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली उभारण्यात आली आहे. शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुखोई, राफेल व मिग विमानांची तैनातीही भारताने केलेली आहे.