नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना एका युवकाने रोड शो दरम्यान थप्पड मारली. यावरुन अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी सुरक्षेतील निष्काळजीपणाला केंद्रातील भाजपा सरकार जबाबदार धरले असून आम आदमी पार्टी संपविण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.
गेल्या पाच वर्षात नऊवेळा आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पाचवेळा हल्ला झाला आहे. देशाच्या इतिहासात अशाप्रकारे कोणत्या मुख्यमंत्र्यांवर हल्ले झाले नसतील. हे हल्ले माझ्यावर नसून दिल्लीत जनतेवर झाले आहेत. जनतेने निवडणूक दिलेल्या मुख्यमंत्र्यावर झाले आहेत. दिल्लीत जनता याचा बदला नक्की घेईल. असे हल्ले केल्याने आमचा आवाज बंद होणार नाही किंवा आमचे धाडस संपणार नाही, अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर टीका केली.
गेल्या चार वर्षात भाजपाने आम आदमी पार्टी संपविण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले आहेत. घरात पोलिसांची आणि ऑफिसमध्ये सीबीआयची धाड टाकली जात आहे. आम आदमी पार्टी राजकारणात उतरल्यामुळे विरोधकांना सहन होत नाही. त्यामुळे अशाप्रकारे हल्ले करण्यात येत आहेत, असाही आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघामध्ये 'रोड शो' करीत असताना सुरेशने जीपवर चढून काल थप्पड लगावली होती. अरविंद केजरीवाल यांच्यावर असा हल्ला होण्याचा ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या पाच वर्षात त्यांच्यावर नऊवेळा आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पाचवेळा हल्ला झाला आहे. एप्रिल 2016 मध्ये दिल्ली सचिवालयात पत्रकार परिषदेतच त्यांच्यावर बूट फेकण्यात आला होता. वेदप्रकाश शर्मा असे या व्यक्तीचे नाव होते.
तर फेब्रुवारी 2016 मध्ये लुधियानामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या कारवर काही लोकांनी लोखंडी रॉडने हल्ला केला होता. ज्यामध्ये कारची काच फुटली होती. जानेवारी 2016 मध्ये छत्रसाल स्टेडिअममध्ये महिलेने शाई फेकली होती. तसेच 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांच्या एका रिक्षाचालकाने कानाखाली मारली होती. अन्य एका ठिकाणी त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती.