चित्तूर – आंध्रप्रदेशच्या चित्तूर येथे एक ह्दयद्रावक घटना समोर आली आहे. मागील ४ वर्षापासून जीवन-मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या ९ वर्षाच्या मुलानं आईच्या कुशीतच अखेरचा श्वास घेतला. अपघातानंतर मुलाच्या नाकातून वारंवार रक्त वाहत होतं. डॉक्टरांनी हात वर केले त्यानंतर आई-वडील इच्छामृत्यूसाठी कोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत होते.
चित्तूर जिल्ह्याच्या चौदेपल्ली परिसरातील बीरजेपल्ली गावातील रहिवासी जी. अरूण हे शेतकरी आहेत. कुटुंबातील पत्नी अरूणा आणि ९ वर्षाचा मुलगा हर्षवर्धन होता. ४ वर्षापूर्वी मुलाचा अपघात झाला होता. तेव्हापासून मुलाची तब्येत खराब झाली होती. अपघाताचा परिणाम त्याच्या डोक्यावर झाला होता. त्यानंतर वारंवार त्याच्या नाकातून रक्त वाहत असल्याचं आईनं सांगितले.
कुटुंबाने मुलाला अनेक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. वेल्लोर ते तिरुपतीच्या बहुतांश दवाखान्यात दाखवले. उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले इतकचं नाही तर जी अरूण यांना स्वत:ची शेतजमिनही विकावी लागली. परंतु मुलाचा आजार आणखी वाढतच गेला. डॉक्टरांनी आता त्याच्यावर कोणताही उपचार नसल्याचं सांगितले. पैसे आणि आशा सगळंही काही संपलं त्यानंतर दोघांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. मुलाला उपचार द्या अन्यथा इच्छामृत्यू यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्याचं निश्चित झालं. कारण मुलाला होणारा त्रास पाहवत नव्हता. गेल्या २ दिवसांपासून मुला घेऊन आईबाप पुंगानूर कोर्टाच्या चक्करा मारत होते.
मंगळवारी आई मुलासोबत कोर्टात आली. परंतु तिथे याचिका दाखल करू शकली नाही. रिक्षातून घरी परतत असताना अचानक मुलाची तब्येत जास्त बिघडली. त्याच्या नाकातून रक्त वाहू लागलं त्यानंतर आईच्या कुशीतच मुलानं जगाचा निरोप घेतला.