ऑनलाइन लोकमत
फरिदाबाद, दि. 15- रूग्णाच्या मृत्यूनंतर मृतदेह घरी नेण्यासाठी हॉस्पिटलकडून अॅम्ब्युलन्स द्यायला नकार देण्याच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. याचसंदर्भातील आणखी एक घटना समोर आली आहे. हॉस्पिटलकडून अॅम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने एका आजोबांना त्यांच्या 9 वर्षाच्या नातीचा मृतदेह खांद्यावर न्यावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फरिदाबादमध्ये ही घटना घडली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून न दिल्याने त्यांना नातीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जावा लागला.
गेल्या दोन दिवसांपासून लक्ष्मी या 9 वर्षाच्या मुलीला ताप येत होता. शनिवारी सकाळी तिला शहराती बादशाह खान हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करायला नकार दिला आणि नंतर तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह घरी न्यायला डॉक्टरांनी सांगितलं पण मृतदेह घरी नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स दिली नाही, अशी माहिती पोलिस प्रवक्त्यांनी दिली आहे. खाजगी अॅम्ब्युलन्ससाठी पैसे नसल्याने त्या मुलीच्या आजोबांनी तिचा मृतदेह खाद्यांवर घेऊन ते घरी निघाल्याचंही पोलीस प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणात तेथिल स्थानिक पत्रकाराने हस्तक्षेप करून त्या कुटुंबाला खाजगी अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आणि तिचा मृतदेह घरी नेण्यात आला. लक्ष्मीला ताप येत असल्याने आधी तिच्या आजोबांनी तिला खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं होतं पण पैसे नसल्याने त्यांना हॉस्पिटलमधून उपचार मिळाले नाहीत, असंही पोलीस प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा
"पाकिस्तानला धडा शिकवणार", शहिदाच्या मुलीचा निर्धार
जम्मू काश्मीर : चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा
अमेरिकेने ISIS चा म्होरक्या अबू सैय्यदला केलं ठार
दरम्यान रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने मृताच्या कुटुंबियांना अॅम्ब्युलन्स नाकारल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. ओडिशामध्ये हॉस्पिटलकडून अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने दाना मांझी यांना त्यांचा पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10 किलोमीटरची पायपीट करावी लागली होती. तर काही दिवसांपूर्वीच झारखंडमध्ये एका कुटुंबाला हॉस्पिटलमधून अॅम्ब्युलन्स द्यायला टाळाटाळ झाल्याने त्यांनी मृत मुलीचा मृतदेह हातगाडीवरून नेला होता.