Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामनवमी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी झाली. राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी होती. त्यामुळे भाविकांमधील उत्साह द्विगुणित झाला होता. राम मंदिराचे लोकार्पण झाल्यापासून आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. हाच अद्भूत अनुभव घेण्यासाठी ३० देशांतील प्रवासी भारतीय अयोध्येत आले होते. यामध्ये ऑस्ट्रेलियापासून ते संयुक्त अरब अमिरातीपर्यंत अनेक देशांत राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी रामललाचे दर्शन घेतले.
३० देशांतील ९० प्रवासी भारतीयांसह ४०० भाविकांच्या समुहाने हनुमान चालिसाचे पठण आणि प्रभू श्रीरामांचा जयघोष करत रामललाचे दर्शन घेतले. सर्वजण भारावून गेल्याचे चित्र होते. राम मंदिर ट्रस्टतर्फे सर्वांचे भव्य स्वागत करण्यात आले. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख राम लाल, हिंदू परिषदेचे संरक्षक दिनेश यांसह अन्य मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
कोणत्या देशांमधून आले होते प्रवासी भारतीय?
भेट देणाऱ्यांमध्ये, ऑस्ट्रेलिया, भूतान, कॅनडा, कोलंबिया, जॉर्जिया, गयाना, केनिया, कझाकिस्तान, मलेशिया, मोझांबिक, मकाऊ, नायजेरिया, नेपाळ, नॉर्वे, रोमानिया, स्पेन, सिंगापूर, सिंट मार्टेन, तैवान प्रजासत्ताक, ताझिकिस्तान, त्रिनिदाद आणि टोबॅगो, तुवालू, तिबेट, युगांडा, युनायटेड किंगडम, संयुक्त अरब अमिराती, उझबेकिस्तान, अमेरिका या देशांतील अनिवासी भारतीयांचा समावेश होता. सर्वांच्या जेवणाची व्यवस्था दिल्लीचे सामाजिक कार्यकर्ते गोपाल गर्ग यांनी केल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असून, त्यानिमित्तानेही हनुमानाचे तसेच रामललाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात अयोध्येत येत आहेत.