- मयूर पठाडे
तुम्हाला माहीत आहे, तुमचं मूल ‘कुपोषित’ आहे? - तुम्ही म्हणाल, काहीतरीच काय, आम्हाला स्वत:लाही जे कधी खायला मिळालं नाही, ते ते सारं त्यांना मिळावं यासाठी आमचा कायम अट्टहास असतो. त्याला जे जे हवं त्यासाठी आम्ही त्याला आजपर्यंत कधीच नाही म्हटलेलं नाही आणि येताजाता तर आम्ही आमच्या मुलांमागे लकडाही लावत असतो, हे खा, ते खा. आजपर्यंत आमचं मूल उपाशीपोटी कधीच झोपलेलं नाही, तरीही तुम्ही म्हणता, तुमचं मूल कुपोषित आहे?
- आश्चर्य वाटेल, पण बर्याच अंशी हे खरं आहे. यासंदर्भात कम्युनिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (सीआयएमएस) या संस्थेनं एक सर्वेक्षण केलं. त्यांचा अभ्यास सांगतो, थोडीथोडकी जाऊ द्या, भारतातील जवळपास 90 टक्के मुलं पोषणअभावयुक्त असू शकतात. मुलांना पोषणयुक्त आहारच मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यात अनेक पोषणमुल्यांचा अभाव आहे. नमुन्यादाखल त्यांनी काही शाळकरी मुलांचा अभ्यास केला आणि त्यावरून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.
याचा अर्थ आपली मुलं पोटभर जेवत नाहीत का?
- नक्कीच ते पोटभर जेवतात, बर्याचदा जरुरीपेक्षा जास्तही खातात, पण आहारातून जे अत्यावश्यक घटक त्यांना मिळायला हवेत, ते त्यांना मिळतात का?
- याचं खरं उत्तर ‘नाही’ असं आहे. आहारातून रोज प्रत्येकाला पुरेसे अन्नघटक मिळाले तरच त्यांची प्रकृती सुदृढ राहू शकते. एखादाच किंवा केवळ काही अन्नघटक रोज खाल्ले जात असतील, तर त्यातून मिळणारे जीवनसत्त्व तेवढे त्या मुलांना मिळतील, पण जे अन्नघटक खाल्लेच जात नाहीत, त्यातून मिळणार्या जीवनसत्त्वांची या मुलांमध्ये कमतरताच आढळून येते.
त्यामुळे पालकांनी हेदेखील लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्या मुलांमध्ये काही प्रकारची पोषणमुल्यं पुरेशी असतील, पण काही प्रकराची पोषणमुल्य नावालाही नाहीत.
हा अभ्यास तर पुढे असंही सांगतो, दहातल्या तब्बल नऊ मुलांना योग्य तो पोषणमुल्याचा आहारच मिळत नाही. देशाची ही भावी पिढी भविष्यात किती सशक्त असेल, याचा मग अंदाजच करायला हवा.
या मुलांमध्ये अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांचा अभाव त्यांना आढळून आला. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, मुलांच्या पेशींच्या वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी आवश्यक असणारे घटक, बी 12, झिंक, आयर्न (लोह). इत्यादि अनेक पोषणमुल्यांची कमतरता या मुलांमध्ये दिसून आली. यांच्या अभावामुळे मुलांची वाढ तर खुंटलेली राहतेच, पण पुरेशा ऊर्जेचा अभाव या मुलांमध्ये असतो. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अँनिमिया, उत्साहाची कमतरता, आकलन क्षमता कमी असणे. अशा अनेक प्रकारचे दुष्परिणाम केवळ आहारातून योग्य ते आणि पुरेसे अन्नघटक न मिळाल्यामुळे आपल्या मुलांमध्ये राहू शकतात.
त्यामुळे आपल्या मुलांना रोजचा आहार देताना त्यांचं पोट भरलं का किंवा भरतं का, यापेक्षाही त्यांच्या शारीरिक मानसिक वाढीसाठी योग्य असलेले अन्नघटक त्यांच्या आहारातून रोज त्यांना मिळतात का याकडे अधिक लक्ष द्यायला हवं.
त्यासाठी खालचा चार्ट नक्की वाचा
आणि लक्षात घ्या,
कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये कोणते दोष निर्माण होऊ शकतात ते. कशातून काय मिळतं ते.
व्हिटॅमिन ए-
याच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो. तेल, मासे, दूध, गाजरातून हे जीवनसत्त्व मिळू शकतं.
व्हिटॅमिन बी वन-
याच्या कमतरतेमुळे बेरी बेरी नावाचा रोग होऊ शकते. त्यासाठी आहारात गहू, गाजर, दूध यांचा समावेश हवा.
व्हिटॅमिन बी टू-
याच्या अभावामुळे वाढ खुंटण्याचा धोका असतो. डाळी, दूध, अंडी, लिव्हर यात हे व्हिटॅमिन मोठय़ा प्रमाणात असतं.
व्हिटॅमिन बी फोर-
जिभ आणि हिरड्यांचे आजार याच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. मांस, मासे, डाळी, शेंगदाणे यांतून हे व्हिटॅमिन आवश्यक तेवढय़ा प्रमाणात मिळू शकतं.
व्हिटॅमिन सी-
हिरड्यांच्या मजबुतीसाठी आणि जखमा लवकर भरण्यासाठी याचा उपयोग होतो. लिंबू, द्राक्षे, टोमॅटो, संत्री, सफरचंद इत्यादिंमध्ये या प्रकारचं व्हिटॅमिन असतं.
व्हिटॅमिन डी-
याच्या कमतरतेमुळे मुडदुससारखा भयानक आजार होऊ शकतो. तूप, लोणी, अँनिमल फॅट्स यातून हे व्हिटॅमिन मिळू शकतं.
व्हिटॅमिन इ-
रक्तसंक्रमण, वंध्यत्वाचे आजार याच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. व्हेजिटेबल ऑईल, दूध, अंडी, भाज्या, अंड्यातील पिवळा बलक यात हे व्हिटॅमिन मिळू शकतं.
व्हिटॅमिन के-
याच्या अभावामुळे जखम झाल्यास मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतं आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाणही कमी असतं. कोबी, पालक, हिरवे टोमॅटो, लिव्हर यातून हे व्हिटॅमिन मिळू शकतं.