कोलकाता : बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना जरब बसेल अशा शिक्षेची तरतुद असलेला कडक कायदा केंद्र सरकारने करावा अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी लिहिलेल्या एका पत्रात केली आहे. तसेच बलात्कार घटनांचे कायदे जलदगती न्यायालयात चालविले जावेत असेही त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व तिची हत्या या पार्श्वभूमीवर देशभरात डॉक्टरांनी आंदोलन केले. त्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या पत्रात ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, देशात दरदिवशी बलात्काराच्या ९० घटना घडतात. त्यातील बहुतांश पीडितांची हत्या केली जाते. ही अतिशय भीषण स्थिती आहे.
महिला सुरक्षित असाव्यात यासाठी केंद्र सरकारने कडक कायदा करावा. बलात्काराच्या घटनांचे खटले जलदगती न्यायालयात चालविले जावेत. तसेच या खटल्यांचा १५ दिवसांत निकाल लावला जावा अशी मागणीही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
कोणीही राजकारण करू नका : सुप्रीम कोर्टबलात्कार व तिच्या हत्या प्रकरणावरून राजकारण करू नये असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना गुरुवारी दिला.या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई होईल असेही न्यायालयाने म्हटले. जर आमच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर कोणी टीका केली तर त्याची बोटे छाटण्यात येतील असे विधान एका मंत्र्याने केले होते. त्यावर गोळ्या झाडू असे वादग्रस्त विधान त्या राज्यातील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनीही केले होते.