पाटणा :बिहारमध्ये एका शिक्षकाच्या खात्यात चुकीने साडेपाच लाख रुपये जमा झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच दाेन शालेय मुलांच्या खात्यात थाेडे थाेडके नव्हे तर तब्बल ९०० काेटी रुपये जमा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे बँक अधिकाऱ्यांची झाेप उडाली आहे, तर लाेकांनी आपले बँक खाते तपासण्यासाठी बँकांबाहेर रांगा लावल्या आहेत. ज्या मुलांच्या खात्यात पैसे जमा झाले त्यांची उत्तर बिहार ग्रामीण बँकेत खाती आहेत. आजमनगर येथील पस्तिया या छाेट्याशा गावात ते राहतात. बिहार सरकारतर्फे विद्यार्थ्यांना गणवेशासाठी पैसे देण्यात येतात. ते पैसे जमा झाले की नाही, हे तपासण्यासाठी ते सीएसपी केंद्रात गेले हाेते.
`खाते तपासल्यानंतर त्यांना माेठा धक्काच बसला. आपल्या खात्यात काेट्यवधी रुपये जमा झाल्याचे पाहून ते हादरून गेले. दाेन्ही मुलांच्या खात्यातील व्यवहारांची तपासणी करण्यात येत आहे. काही तांत्रिक चुकीमुळे त्यांच्या खात्यात एवढी रक्कम दिसत आहे. मात्र, त्यांच्या खात्यात प्रत्यक्षात एवढी रक्कम नसल्याची माहिती शाखा व्यवस्थापक मनाेज गुप्ता यांनी दिली.