ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 29- सध्याच्या युगाला खरंतर डिजिटल युग असं आपण म्हणतो आहे. अख्खं जग डिजिटल क्रांतीच्या बाजूने आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण या क्रांतीचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. याचीची प्रचिती येते झारखंडमधील एका गावाकडे पाहिलं तर. झारखंडमधल्या एका गावात डिजिटल क्रांतीचा खूप गाजावाजा सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे गावाची लोकसंख्या एक हजार आहे पण डिजिटल माध्यमाचा वापर करणाऱ्या या गावात ९०० सायबर चोर असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गुजरात पोलिसांनी नुकतंच झारखंडमध्ये केलेल्या एका सर्च ऑपरेशन दरम्यान ही धक्कादायक माहिती समोर आली.
आरोपी मोहम्म जिलानी अन्सारी याचा अहमदाबाद क्राइम ब्रँच सायबर सेलकडून शोध सुरू होता. ऑनलाइनद्वारे गुजरातमधील १५ लोकांना लुटल्याचा जिलानीवर आरोप होता. जिलानीच्या पकडण्यासाठी अहमदाबाद पोलीस झारखंडला पोहचले होते. झारखंडमधील गिरीडिह गावाच्या सिमेवर पोहचल्यावर आता आपण सायबर झोनमध्ये प्रवेश करत आहोत, असं स्थानिक पोलिसांनी सांगताच अहमदाबाद पोलीस थक्क झाले.
पोलिसांनी चौकशीची माहिती गुप्त ठेवली होती. पण बिंसमी गावात प्रवेश करणार तेवढ्यात आपण ऑनलाइन हेराफेरी करणाऱ्या आरोपीला शोधायला आला आहात का? असा सवाल एका स्थानिक पोलिसाने केला. त्याला होकार देताच सायबर झोनमध्ये आणखी कुणाला शोधणार? असा उलट सवाल त्याने केल्याचं अहमदाबादच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. झारखंडमधील गिरीडिह, देवघर आणि जामताडा ही तिन्ही गावं सायबर क्राइमचं हब बनली आहेत. गिरीडिही गावात तर एक हजार घरं असून तिथे ९०० सायबर आरोपी राहत असल्याचं त्या स्थानिक अधिकाऱ्यानं सांगितलं.
"गुजरात हा भाग आरोपी अंसारीचा आवडता भाग आहे. तेथे तो दररोज 200 पेक्षा जास्त फोन कॉल्स करायता. प्रत्येक 10 ते 15 कॉल्सवर तो गावातील व्यक्तीला एटीएम कार्ड नंबर, सीवीवी नंबर आणि वन टाइम पासवर्ड द्यायला तयार करायचा. त्यानंतर त्या व्यक्तीच्या अकाऊंटमधील पैसे त्याच्या इ-वॉलेटमध्ये ट्रान्सफर करत असत. दहा वेगवेगळ्या खोट्या इमेल आयडीवरून तो ई-वॉलेट वापरत असायचा", अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.