नवी दिल्ली : देशात शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाच्या ४३,२९३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ९११ रुग्णांचा मृत्यू झाला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. रुग्णांची संख्या कमी होत असली तरी गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने काळजी निर्माण झाली आहे. देशव्यापी मोहिमेत ३६.८९ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे.
उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,५८, ७२७ असून, देशात आतापर्यंत ४,०५,९३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांच्या संख्येत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण १.४९ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१९ टक्के आहे.
लसीच्या तिसऱ्या डोससाठी फायझर-बायोएनटेक परवानगी मागणार - कोरोना विषाणूच्या मूळ स्ट्रेनवर अधिक परिणामकारक ठरण्यासाठी फायझर-बायोएनटेक कोविड-१९ लस ‘कोमिरनॅटी’ची तिसरी मात्रा गरजेची ठरू शकते, असे वृत्त शुक्रवारी प्रसार माध्यमांनी कंपन्यांच्या निवेदनाच्या आधारे दिले. दक्षिण अफ्रिकेत पहिल्यांदा समोर आलेला बेटा व्हेरिएंट आणि भारतात सापडलेल्या डेल्टा व्हेरिएंटपासूनही कोविड-१९ लसीची तिसरी मात्रा चांगले संरक्षण देईल, असे सध्या लसीच्या सुरू असलेल्या चाचणीच्या तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे अपेक्षित आहे. सार्स-कोव्ह-२ विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटवर लस कमी परिणामकारक असल्याचे सांगितले गेल्यानंतर या घडामोडी घडल्या.
- हंगामी चाचणीच्या माहितीने तिसरी मात्रा ही त्याच कोरोना विषाणूंच्या व्हेरिएंटशी लढताना अँटिबॉडीची पातळी पाच ते दहा पटींनी (पहिल्या दोन मात्रांच्या तुलनेत) वाढवते, असे दाखविल्यामुळे फायझर आणि बायोएनटेकने आमच्या कोविड-१९ लसीच्या तिसऱ्या मात्रेला नियामक मान्यता मागत आहोत, असे गुरुवारी जाहीर केले. - या पार्श्वभूमीवर लसीच्या पहिल्या दोन मात्रा घेतल्याच्या तुलनेत चांगले संरक्षण मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.
लाम्बडा विषाणू भारतात नाही- देशात कोरोनाच्या लाम्बडा या विषाणूचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही असे केंद्राने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाम्बडा विषाणू जगातील तीस देशांमध्ये पसरला आहे. त्यात भारताचा समावेश नाही.- पेरू या देशातून लाम्बडा विषाणूचा उगम झाला. त्या देशामध्ये दर एक लाख लोकांमागे ५८७ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. - लाम्बडा विषाणूच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही नुकतेच जाहीर केले होते. कोरोनाच्या मूळ विषाणूपेक्षा लाम्बडाचा संसर्ग अधिक वेगाने पसरतो.