नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिराचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन करण्यात आले. कोरोना संकटामुळे भूमिपूजन सोहळ्याला फक्त खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. राम मंदिर आंदोलनाशी संबंधित अनेकांनी वय आणि आरोग्याच्या समस्येमुळे संपूर्ण सोहळा घरीच टीव्हीवर पाहिला.
सर्वोच्च न्यायालयात रामलल्ला विराजमानतर्फे बाजू मांडणारे आणि खटला लढणारे ज्येष्ठ वकील 92 वर्षीय के. परासरन यांनी राम मंदिर भूमिपूजनाचा संपूर्ण कार्यक्रम घरातूनच टीव्हीवर पाहिला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोत परासरन अतिशय भावनिक झाल्याचे दिसून येत आहे.
परासरन यांना राम मंदिराच्या बांधकामासाठी स्थापन केलेल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे संस्थापक- सदस्य केले आहे. त्यांचे निवासस्थान आर -20, ग्रेटर कैलाश पार्ट 1 या पत्त्यावर ट्रस्टची नोंद देखील करण्यात आली आहे. रामलल्ला विराजमानचे वकील राहिलेले परासरन यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. परासरन कायद्याचे पदवीधर आहेत. हिंदू कायद्यात त्यांना गोल्ड मेडलने गौरवण्यात आले आहे.
- तामिळनाडूच्या श्रीरंगम येथे जन्मलेल्या परासरन यांनी 1958 मध्ये सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून सराव सुरू केला. आपल्या सहा दशकांच्या कारकीर्दीत, त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण बाबींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.- हिंदू धर्मावर त्यांचे प्रभुत्व असल्याने या खटल्यात त्यांना जास्त स्वारस्य होते. ते दोनवेळा देशाचे अटॉर्नी जनरल म्हणून कार्य केले आहे.- माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती, त्यावेळी ते तामिळनाडूचे महाधिवक्ता होते.- 1980 मध्ये ते देशाचे सॉलिसिटर जनरल बनले आणि 1983 ते 1989 पर्यंत ते देशाचे अटॉर्नी जनरल होते.- परासरन यांना अटलबिहारी वाजपेयी सरकारकडून पद्मभूषण आणि मनमोहन सिंग सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.- याशिवाय, परासरन यांनी राष्ट्रपती कोट्यातून सहा वर्षांसाठी राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती.