नवी दिल्ली - शिक्षणाला वयाची अट नसते याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी एका आजोबांनी मास्टर्सची डिग्री पूर्ण केली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) दीक्षांत समारंभात 93 वर्षीय विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला आहे. सीआय शिवासुब्रमण्यम असं आजोबांचं नाव असून ते या दीक्षांत सोहळ्यातील सर्वात ज्येष्ठ विद्यार्थी होते. सर्वच स्तरातून आजोबांचं कौतुक केलं जातं आहे.
शिवा यांनी पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेतले आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात एचआरडी मंत्री रमेश पोखरियाल देखील उपस्थित होते. त्यांनी शिवा यांना 93 वर्षांचा 'तरुण' म्हणत त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1940 मध्ये शिवा यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले होते. त्यानंतरही त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचे होते. मात्र आई-वडील आजारी असल्याने त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. यानंतर त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्समध्ये शिवा यांनी क्लार्कची नोकरी केली. त्यानंतर 1986 मध्ये वयाच्या 58 व्या वर्षी संचालक पदावरुन निवृत्त झाले.
नोकरी आणि घर सांभाळत असताना शिवा यांचे पदवीधर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. निवृत्तीनंतरही कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने शिक्षण घेता येत नव्हतं. त्याचदरम्यान शिवा यांच्या फिजियोथेरेपिस्टने इग्नूमध्ये कोर्स करणार असल्याची माहिती त्यांना दिली. शिवा यांनी डॉक्टरांना अभ्यासक्रमांविषयी विचारपूस करण्यास सांगितली. त्यावेळी तेथे शिक्षण घेण्यासाठी वयोमर्यादा नसल्याचं समजलं. त्यानंतर शिवा यांनी पदवीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.
'मला माहीत नव्हतं की हा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत मी जिवंत असेन की नाही' असं शिवा यांनी म्हटलं आहे. त्यांच्या नातवंडांचं शिक्षण पूर्ण झालं आहे. काहींचं लग्न झालं आहे. शिवा यांना पुढे एमफिलची करण्याची देखील इच्छा आहे. मात्र एमफिल करण्यासाठी फार कमी जागा असतात. त्यामुळे शिवा कमी कालावधीत करण्यात येणाऱ्या कोर्सच्या शोधात आहेत. काही दिवसांपूर्वी केरळच्या 105 वर्षीय आजीने चौथीच्या परीक्षेत 75% गुण मिळवून इतिहास रचला आहे. साक्षरता अभियानाअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या त्या सर्वात जास्त वयाच्या व्यक्ती ठरल्या. भागिरथी अम्मा असं आजीचं नाव असून त्यांनी चौथीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. भागिरथी अम्मा यांनी केरळमधील साक्षरता अभियानाअंतर्गत चौथीची परीक्षा दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
भारतातल्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; यंदा मिळणार 'इतकी' पगारवाढ
भारतासोबत ट्रेड डील करण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीच उपस्थित केली शंका
Jammu And Kashmir : त्राल चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा
७३ हजार लोकांना संसर्ग; कोरोनाचे १९०० बळी
भूखंडाचे श्रीखंड : सरकारी जमीन लाटली, आम्ही नाही पाहिली