लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा :बिहारच्या एका कार्यकारी अभियंत्याच्या घरी दक्षता पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये माेठे घबाड पकडले आहे. कार्यकारी अभियंता अजय कुमार सिंह यांनी जमवलेला पैसा आणि मालमत्ता पाहून पथकातील सदस्यांचे डोळेच पांढरे होण्याची वेळ आली. ९५ लाख रोख आणि सोने-चांदीचे दागिने, इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सरकारच्या मोहिमेमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती असल्याची अनेक प्रकरणे बिहारमध्ये उघडकीस येत आहेत. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली. अजयकुमार सिंहने अनेक ठिकाणी मालमत्तांची खरेदी केली आहे. त्याबाबत कागदपत्रे आणि विविध बॅंकांमधील खात्यांचे पासबुकही कारवाईदरम्यान सापडले. जमीन आणि सदनिकांची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांना चांदीच्या तीन विटा सापडल्या असून त्यांचे वजन तब्बल ३ किलो आहे. याशिवाय ४ दुचाकीदेखील आढळल्या आहेत.