तिरुअनंतपुरम - केरळच्या 96 वर्षीय आजीने परिक्षेत 98% गुण मिळवून एक इतिहास रचला आहे. ‘अक्षरलक्ष्यम’ साक्षरता कार्यक्रमांतर्गत झालेल्या परीक्षेत आजीने 100 पैकी 98 टक्के मिळवत पहिला क्रमांक पटकावला होता. कार्तियानी अम्मा असं या आजीचं नाव आहे. बुधवारी (7 नोव्हेंबर) केरळ सरकारने आजीला बक्षीस म्हणून नवीन लॅपटॉप दिला आहे. परीक्षेत टॉपर असलेल्या आजीने काही दिवसांपूर्वी संगणक शिकण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळेच केरळ सरकारचे शिक्षणमंत्री रवींद्रनाथ यांनी कार्तियानी अम्माला लॅपटॉप दिला आहे.
ऑगस्टमध्ये ‘अक्षरलक्ष्यम’ साक्षरता परीक्षा घेण्यात आली होती. 31 ऑक्टोबरला या परिक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला होता. परीक्षेत यश संपादन केल्यानंतर आजींना तुम्ही 96 वर्षीय वयात संगणक शिकू इच्छिता का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर 'कोणी मला संगणक देत असेल तर मी नक्की शिकेन' असं उत्तर दिलं होतं. कार्तियानी अम्मा यांना दहावीची परीक्षा पास होण्याची इच्छा आहे.