लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एकीकडे दिवसाकाठी देशात विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असली तरी दुसरीकडे विमान कंपन्यांच्या तांत्रिक मुद्द्यांमुळे प्रवाशांना वंचित राहण्याचे प्रमाणदेखील वाढताना दिसत आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत देशातील सर्व प्रमुख कंपन्यांनी एकूण ९६८७ प्रवाशांना विमान प्रवासापासून वंचित ठेवले असून त्यातील जवळपास ७० टक्के प्रवासी हे एअर इंडियाचे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
एअर इंडियाने सहा महिन्यांत वंचित ठेवलेल्या प्रवाशांची संख्या ६७०० एवढी आहे. प्रवाशांकडून तिकीट रद्द होण्याची शक्यता गृहित धरून कंपन्या विमानातील आसन क्षमतेपेक्षा काही टक्के अधिक तिकिटविक्री करतात.
मुळात गेल्या दीड वर्षापासून विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्याने तिकिटे रद्द होण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. मात्र, तरीही विमान कंपन्यांकडून अतिरिक्त तिकिटांची विक्री केली जात असल्याने अधिकाधिक प्रवाशांवर प्रवासापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे.
विमान रद्द होणे,अन्यत्र वळवणे याचा प्रवाशांना फटका बसतो. तांत्रिक बिघाडामुळे विमान रद्द करण्यामुळे प्रवासी वंचित राहत असल्याचे स्पष्ट झाले. प्रवासापासून वंचित राहिलेल्या प्रवाशांना परताव्यापोटी कंपन्यांनी सहा महिन्यांत एकूण साडे सात कोटी खर्च केल्याची आकडेवारीही समोर आली आहे.