ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 26 - आपल्या 97 वर्षाच्या वडिलांना कैदेत ठेवणा-या 70 वर्षीय मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपले वृद्ध वडिल घरातून बाहेर जाऊ नयेत यासाठी श्रीचरण 97 वर्षीय वडिलांना साखळदंडाने बांधून ठेवत असे असा आरोप आहे. मैनपुरी येथील बुसरा सुल्तानपूर गावची ही घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम चरण यांचा मुलगा आणि सून रोज सकाळी शेतीसाठी घराबाहेर पडतात. यावेळी जाताना आपले वडिल घराबाहेर जाऊ नयेत यासाठी त्यांना साखळदंडाने बांधून ठेवलं जायचं. त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे की, जेव्हा शेती करण्यासाठी त्यांचा मुलगा घराबाहेर जायचा तेव्हा राम चरण विचित्रपणे वागायचे. कधी कधी ते अंगावरील सगळे कपडे काढून टाकायचे. तर कधी शेजा-यांच्या घरासमोर जाऊन लघवी करायचे. यामुळेच त्यांच्या मुलाने आणि सुनेने घराबाहेर पडण्याआधी त्यांना बांधून ठेवण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी राम चरण यांना चुकीच्या पद्धतीने कैदेत ठेवल्याप्रकरणी श्रीचरण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामचरण यांच्या नावे 13 एकर जमीन असल्यानेच त्यांना असं कैदेत ठेवलं जात असल्याचं स्थानिक सांगत आहेत. त्यांना कोणीतरी आपल्या जाळ्यात ओढून सगळी संपत्ती नावे करुन घेईल अशी भीती त्यांच्या मुलांना वाटते.