एका वर्षात ९८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या अन् मोदी विश्व गुरू व्हायला चाललेत; काँग्रेसचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 03:11 PM2021-07-12T15:11:15+5:302021-07-12T15:12:15+5:30
एका वर्षात देशातील ९८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्व गुरू व्हायला चालले आहेत, पहिलं तुम्ही देशाचे गुरू तरी बना, असा खोचक टोला काँग्रेसचे नेते मल्लिकार्झुन खरगे यांनी मोदींना लगावला आहे.
एका वर्षात देशातील ९८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्व गुरू व्हायला चालले आहेत, पहिलं तुम्ही देशाचे गुरू तरी बना, असा खोचक टोला काँग्रेसचे नेते मल्लिकार्झुन खरगे यांनी मोदींना लगावला आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं दिल्लीत पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यात मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला.
काँग्रेसच्या योजनेमुळे देशातील २७ टक्के जनता गरिबीतून बाहेर आली तर मोदींमुळे २३ टक्के जनता पुन्हा गरिबीत ढकलली गेली. त्यामुळे मोदी सरकार हे लोकांचं उत्पन्न वाढवणारं नव्हे, तर उत्पन्न घालवणारं सरकार आहे, असा आरोप खरगे यांनी यावेळी केला.
पेट्रोलनं गाठली शंभरी
देशात आज अनेक ठिकाणी पेट्रोल १०० रुपयांच्या घरात पोहोचलं आहे. देशात आज महाराष्ट्रात सर्वाधिक महाग पेट्रोल विकलं जातंय. मुंबईसारख्या शहरात आज पेट्रोल प्रतिलीटर १०८ रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. केंद्र सरकार इंधनाच्या किमतीवर सेस लावत आहे. तो कोणत्याही राज्याला मिळत नाही. तो थेट केंद्र सरकारच्या तिजोरीत जात आहे. पेट्रोलवर कर लादून केंद्रानं २५ लाख कोटी रुपये कमावले आहेत. पण त्यातील कोणताही महसूल राज्याला दिलेला नाही, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
मोदींनी ५ वर्ष मागितली होती त्याचं काय झालं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी काँग्रेसला ७० वर्ष दिली. मला ५ वर्ष द्या, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करुन दाखवतो असं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं?, असा खोचक सवाल खरगे यांनी यावेळी उपस्थित केला. देशाच्या इतिहासात आज सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल विकलं जात आहे. तर सिलिंडरच्या दरातही वाढ झालीय. सिलिंडरवर मिळणारं अनुदान गेल्या तीन महिन्यांपासून कुणालाही मिळालेलं नाही, असंही खरगे म्हणाले.