रोहटक : देशातील ९९ टक्के नेते हे दांभिक असून, त्यांचा पर्दाफाश करण्यात आपण संकोच करणार नाही, अशा शब्दांत योगगुरू बाबा रामदेव यांनी येथे नेत्यांवर टीका केली. रोहटकमध्ये झालेल्या गुरुकूल महोत्सवात बोलताना रामदेवबाबा म्हणाले की, राजकारणात सक्रिय होण्यात मला रस नाही. मात्र देशातील ९९ टक्के राजकीय नेते दांभिक आहेत; व संधी मिळेल तेव्हा या भ्रष्ट नेत्यांचा पर्दाफाश करण्यात मला काहीच अडचण असणार नाही.स्वयंघोषित बाबा, देवाचा अवतार व हातावरून भविष्य सांगणाºयांपासून सावध राहा, असा सल्लाही त्यांनी सर्व उपस्थितांना दिला. जर असे बाबा तुमचे भविष्य सांगण्याचा दावा करत असतील तर तुम्ही आधी त्यांचे बूट लपवून ठेवा आणि ते कुठे आहेत हे त्यांना विचारा. ते तरी त्यांना सांगता येते का, हे तपासून पाहा, असा चिमटाही त्यांनी काढला. ज्यांना स्वत:चे भविष्य आणि भवितव्य माहीत नाही ते तुमचे भविष्य सांगून पैसे कमवितात आणि तुम्हालाही फसवतात, असेही रामदेव यांनी बोलून दाखवले. सर्वांनी वैज्ञानिक निष्ठा बाळगायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिली. ते म्हणाले, जर लोकांकडे वैज्ञानिक वैचारिकता नसेल तर, राम रहीम याच्यासारखे अनेक बाबा लोकांना मूर्खात काढत राहतील. त्यांच्यापासून सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे.आरोपांचा समाचारअलीकडच्या काळात काही बाबांवर अनेक आरोप झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांनी अशांचा आज समाचार घेतला. हरयाणा सरकारने बाबा रामदेव यांना आयुर्वेद आणि योग यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर बनविले आहे.
९९ टक्के राजकीय नेते दांभिक, भ्रष्ट नेत्यांचा पर्दाफाश करण्यास अडचण नाही, रामदेवबाबा यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 5:20 AM