पाटणा : बिहारमध्ये बंदूक आणि गुंडशाहीच्या बळावर निवडणुका लढण्याची परंपरा दशकानुदशके चालत आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनी आजवर महत्त्वाची भूमिका वठवली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीतही बंदुकीच्या खटक्यावर बोट ठेवणारे बाहुबलीं पुन्हा एकदा सरसावलेले दिसतील. पूर्वाश्रमीच्या अनेक गुंडांनी थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश मिळविला आहे. यावेळी ९९ कलंकित उमेदवार निवडणूक रिंगणात भवितव्य अजमावत आहेत.काहींनी पत्नी आणि नातेवाईकांना तिकिटे मिळवून दिली आहेत. काही जण प्रत्यक्ष निवडणुकीत उतरणार नसले तरी उमेदवारांच्या भवितव्यावर त्यांचा चांगलाच प्रभाव राहील, असे संकेत मिळाले आहेत. निवडणूक लढण्यासाठी धनशक्ती आणि मनगटी शक्तीची गरजच त्यातून अधोरेखित होत आहे. निवडणूक आयोगाने राजकीय यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न चालविले असले तरी पक्षांनी निवडणूक जिंकायचीच हा उद्देश ठेवून राजकीय शुचितेला बगल दिलेली आढळते. (वृत्तसंस्था)--------यावेळी गुन्हेगारी आरोप असलेले ९९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत डेमॉक्रॅटिक रिफॉर्म या स्वयंसेवी संस्थेने १४१ कलंकित उमेदवारांची ओळख पटविली होती. गेल्या पाच वर्षांत त्यापैकी काही जण निर्दोष सुटले. काही सध्या हयात नाहीत. पण बाहुबलींचा वरचष्मा कायम आहे. भाजप आणि जेडीयूने एकत्रितरीत्या सात डझनावर (८४) कलंकित उमेदवारांना तिकिटे दिली आहेत. राजदने सहा तर जीतनराम मांझी यांच्या हम आणि काँग्रेसने प्रत्येकी तीन, लोजपाने एका कलंकित उमेदवाराला स्थान दिले आहे. ३० उमेदवारांवर खून, अपहरण, खंडणीवसुली आणि लुटमारीसारखे गंभीर आरोप आहेत.त्यातील १७ उमेदवार महायुतीकडे तर १३ उमेदवार रालोआकडे आहेत.
९९ कलंकित उमेदवार
By admin | Published: September 29, 2015 11:18 PM