तरुण आला, रवा इडली खरेदी केली, त्यानंतर... बंगळुरू कॅफे ब्लास्टबाबत समोर आली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 08:32 AM2024-03-02T08:32:59+5:302024-03-02T08:33:34+5:30
Bangalore Cafe Blast: रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट दुपारी सुमारे एक वाजण्याच्या दरम्यान झाला. २८ ते ३० वर्षांचा एक तरुण कॅफेमध्ये आला. त्याना कउंटरवरून रवा इडली खरेदी केली. त्यानंतर तो एक बॅग कॅफेसमोरील एका झाडाजवळ ठेवून निघून गेला. तिथे बॅग ठेवल्यानंतर सुमारे एका तासानंतर स्फोट झाला
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले की, बंगळुरूच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेला स्फोट हा कमी तीव्रतेचा होता. तसेच त्यामध्ये टायमर लावण्यात आलेला होता. शिवकुमार यांनी राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्यासोबत घटनास्थळाचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. शिवकुमार यांनी सांगितले की, रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट दुपारी सुमारे एक वाजण्याच्या दरम्यान झाला. २८ ते ३० वर्षांचा एक तरुण कॅफेमध्ये आला. त्याना कउंटरवरून रवा इडली खरेदी केली. त्यानंतर तो एक बॅग कॅफेसमोरील एका झाडाजवळ ठेवून निघून गेला. तिथे बॅग ठेवल्यानंतर सुमारे एका तासानंतर स्फोट झाला.
उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, हा एक कमी तीव्रतेचा स्फोट होता. त्याने टायमर लावून स्फोट घडवून आणला होता. या प्रकरणाचा तपास सीबीसीकडे सोपवण्यात आला आहे. एफएसएल आणि बॉम्ब निष्क्रिय करणाऱ्या पथकाने घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे. तपासासाठी सात ते आठ पथके तयार करण्यात आली आहेत. कुणीही चिंतीत होण्याची गरज नाही. जो दोषी असेल त्याचा शोध घेऊन कारवाई केली जाईल. पोलिसांना तपासाचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे.
शिवकुमार यांनी पुढे सांगितलं की, या घटनेत १० जण जखमी झाले आहेत. मात्र कुणाचीही स्थिती गंभीर नाही आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. पोलीस जे योग्य समजतील त्यानुसार तपास करण्याचं स्वातंत्र्य त्यांना देण्यात आलं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या सत्ताकाळात अशा घटना घडत आहेत, असा आरोप भाजपाने केला आहे. या आरोपांबाबत विचारले असता शिवकुमार म्हणाले की, त्यांना जे आरोप करायचे आहेत ते करू द्या. आमच्यासाठी हे आरोप नाही. आम्ही कर्नाटकच्या प्रतिमेचा विचार करतो. २०२२ मध्ये मंगळुरूमध्ये काय झालं होतं. अशाच प्रकारच्या घटना भाजपाच्या कार्यकाळात घडल्या होत्या. मी येथे कुणावर आरोप प्रत्यारोप करू इच्छित नाही, असेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले.