राजस्थानात ३०० वर्ष जुन्या शिव मंदिरावर चालवला बुलडोझर; भाजपा आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 03:35 PM2022-04-22T15:35:20+5:302022-04-22T15:35:54+5:30
व्होट बँकेला खुश करण्यासाठी काँग्रेसनं ३०० वर्ष जुनं मंदिर तोडलं असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष सतीश पुनीया यांनी म्हटलं आहे.
अलवर – राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात राजगड येथे ३०० वर्ष जुनं शिवमंदिर बुलडोझरनं जमीनदोस्त करण्यात आले आहे. शिवालयवर बुटं घालून मूर्ती कटर मशीननं तोडल्याने हिंदुत्ववादी संघटना भडकल्या आहेत. याविरोधात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु अद्याप याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. आता यावरून भाजपानेकाँग्रेसच्या गहलोत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
भाजपाचे पदाधिकारी अमित मालवीय म्हणाले आहेत की, हिंदुंच्या भावना दुखावण्यासाठी काँग्रेसचं पुरोगामित्व आहे. विकासाच्या नावाखाली अलवर येथे ३०० वर्ष जुनं शिव मंदिर तोडण्यात आले. करौली, जहांगीरपुरी येथील कारवाईवर अश्रू वाहायचे आणि हिंदू धर्माला दुखवायचे ही काँग्रेसची नीती आहे. १८ एप्रिलला राजस्थानच्या राजगड येथे विना नोटीस प्रशासनाने ८५ हिदूं घरांवर आणि दुकानांवर बुलडोझर चालवण्यात आले.
तर राजस्थान सरकारचे मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी भाजपाचा आरोप फेटाळून लावला आहे. राजगड नगरविकास बोर्डाचे चेअरमन भाजपाचे आहेत. रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी मंदिर आणि घरं पाडण्यात आली. हा प्रस्ताव त्यांनीच आणला होता. त्यांच्याच इशाऱ्यावर मंदिर तोडण्यात आले. आमचे काँग्रेस आमदार विरोध करत असताना हे झाले. जर कुठलीही कायदेशीर अडचण नसेल तर मंदिर पुन्हा बनवलं जाईल असंही त्यांनी सांगितले आहे. तर सरकारने मंदिर वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग काढायला हवा होता. करौलीच्या घटनेनंतर सरकारची नियत स्पष्ट नाही. व्होट बँकेला खुश करण्यासाठी काँग्रेसनं ३०० वर्ष जुनं मंदिर तोडलं असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष सतीश पुनीया यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
अलवर येथे राजगडमध्ये हिंदू मंदिर जमीनदोस्त करण्याचा प्रकार उघड झाला आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली राजगड प्रशासनाने ३०० वर्ष जुनं मंदिर पाडण्यात आले. या मंदिरात लावलेले भगवान शिव, हनुमान, अन्य देवीदेवतांचे फोटोही काढले गेले. स्थानिकांनी याचा विरोध केल्यानंतर पोलिसांनी ताकदीचा वापर करत त्यांना हटवण्यात आले. या घटनेचा विरोध करत हिंदु संघटना आक्रमक झाल्या आहेत. या विरोधात राजगड आमदार जोहरी लाल मीणा, एसडीएम केशव कुमार मीणा आणि पालिका अधिकाऱ्यांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. परंतु अद्याप याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला नाही.