छत्तीसगडमधील एमसीबी जिल्ह्यातील मनेंद्रगड ठाणे परिसर आणि स्टाफ लाइनमध्ये एक जंगली अस्वल घुसल्याने एकच खळबळ उडाली. सुमारे तासभर हे अस्वल पोलीस ठाण्यासह निवासी भागात फिरत होते. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. रहिवासी भाग असल्याने वनविभागाने तत्परता दाखवत अस्वलाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर या अस्वलाला जंगलात पळवून लावण्यात यश मिळालं.
एमसीबी जिल्ह्यातील मनेंद्रगड पोलीस ठाणे क्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांची अस्वल परिसरात घुसल्याची माहिती मिळताच बोबडी वळली. मोकाट कुत्र्यांनी पाठलाग केल्याने हे अस्वल पोलीस ठाण्याच्या परिसरातून पळाले. मात्र नंतर ते रहिवासी वस्तीमध्ये घुसले. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामध्ये स्वत:ला वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे फिरताना दिसत आहेत. त्यानंतर बराच वेळ हे अस्वल पोलीस ठाणे परिसरासह इकडे तिकडे फिरताना दिसत होते.
परिसरात अस्वल घुसल्याची माहिती मिळताच वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी त्या अस्वलाला जंगलाच्या दिशेने पिटाळले. अन्न आणि पाण्यासाठी वन्य प्राण्यांचा रहिवासी भागातील वावर वाढला आहे. निवासी भागामध्ये असे प्राणी घुसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्यातरी या अस्वलाला जंगताल पिटाळल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.