इन्स्टाग्राम पेजवर लाइक्स मिळविण्याचा नवीन मार्ग शोधत तामिळनाडूतील एका तरुणाने भररस्त्यात आंघोळ करण्याचे त्याच्या मित्राचे आव्हान स्वीकारले. दुचाकीवरच बसून त्याने आंघोळ केली आणि १० रुपयांची पैज जिंकलाही. मग व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी त्याने तो सोशल मीडियावर शेअर केला. पण, त्याच्या कृत्याने पोलिसांचे लक्ष वेधून घेतले अन् ३,५०० रुपयांचा त्याला दंड ठाेठविण्यात आला.
एम. फारूख (वय २४) हा तरुण आणि त्याचा मित्र रविवारी स्कूटीवर पाण्याने भरलेली बादली आणि मग घेऊन इरोडमधील एका सिग्नलजवळ पोहोचले. भरस्त्यात दुचाकीवर बसूनच अंगावर पाणी ओतून आंघोळ केली. आजूबाजूच्या लोकांनी आक्षेप घेतला असता, उष्णतेवर मात करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितले.
व्हिडीओची माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांनी वाहतूक पोलिसांना त्याला दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. सोमवारी हेल्मेट न घालणे, वाहतुकीचे उल्लंघन आणि शांतता भंग केल्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हे फक्त पैशासाठी आणि सोशल मीडियावरील लाइक्ससाठी केले होते, असे त्याने सांगितले. पुन्हा असे कृत्य केल्यास अटक करण्याचा इशारा पोलिसांनी दिला. उल्हासनगरमध्येही काही दिवसांपूर्वी असाच प्रकार समोर आला होता. त्यामुळे ही बेजबाबदार वर्तणूक असल्याचे म्हणत नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.