एकीकडे राजकीय पक्षांच्या इलेक्टोरल बाँडवर सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीरचा शिक्का मारलेला असताना त्याच्या दुसऱ्या दिवशीच काँग्रेसने मोठा आरोप केला आहे. पक्षाची सर्व बँक खाती गोठविण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस नेते अजय माकन यांनी हा आरोप केला आहे. देशाच्या प्रमुख विरोधी पक्षाची सर्व खाती फ्रीज करण्यात आली आहेत. अकाऊंटवर टाळेबंदी करण्यात आली आहे. ही फक्त काँग्रेसच्याच अकाऊंट गोठविली नाहीत तर आपल्या देशाची लोकशाही गोठविली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
काँग्रेस आणि युवक काँग्रेसची खाती गोठविण्यात आली आहेत. यामुळे काँग्रेसच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा पगार करणे कठीण झाले आहे. तसेच अन्य बाबींसाठी देखील पैसे देणे ठप्प झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यास काही आठवडेच राहिले आहेत. अशावेळी असे पाऊल उचलून केंद्र सरकारला काय साध्य करायचे आहे. आयकर विभागाने २१० कोटी रुपयांची मागणी केली आहे, असे माकन म्हणाले.
2018-19 च्या आयकर भरण्याच्या आधारावर कोट्यवधी रुपयांची मागणी केली जात आहे. आहे. ही अत्यंत लाजिरवाणी, लोकशाहीची हत्या आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आमची खाती गोठवण्यात आली आहेत. काँग्रेस पक्ष सदस्यत्व मोहिमेद्वारे युवक काँग्रेसकडून पैसे गोळा करतो आणि तेही गोठवले गेले आहेत, असा आरोप माकन यांनी केला आहे.