नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. केजरीवालांचे निकटवर्तीय आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दिल्लीतील अबकारी धोरणातील कथित अनियमिततेप्रकरणी राजधानी दिल्लीसह ७ अन्य राज्यांमधील २१ ठिकाणी छापेमारी केली होती. यादरम्यान, तपास यंत्रणांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावरही धाड टाकली होती. आता या प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने या प्रकरणात एकूण १५ जणांना आरोपी केले आहे. त्यात मनीष सिसोदिया यांचा आरोपी क्रमांक एक असा उल्लेख करण्यात आला आहे. सीबीआयने पीसी अधिनियम १९८८, १२०बी, ४७७ए मूळ गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या छापेमारीदरम्यान मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानातून आक्षेपार्ह दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. सीबीआयने एका सार्वजनिक साक्षीदाराच्या उपस्थितीत काही कागदपत्रे जप्त केली आहेत. भविष्यात कुठलाही वाद होऊ नये म्हणून संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेसह अशी पावले उचलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तपास यंत्रणा त्यांच्या घरातील विविध कागजपत्रांचीही छाननी करत आहेत. तसेच सिसोदिया यांची चौकशीही केली जात आहे.
सीबीआयच्या पथकांनी माजी अबकारी आयुक्त ई. गोपीकृष्ण, चार लोकसेवक आणि इतर काही जणांच्या घरावरही छापेमारी केली आहेत. दरम्यान, आपण निर्दोष असून, सीबीआय केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा आरोप केला होता. आपल्या घरावर झालेली छापेमारी ही दुर्भाग्यपूर्ण असून, देशासाठी चांगलं काम करणाऱ्यांना त्रास दिला जात आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, सिसोदिया यांनी अधिकाऱ्यांचे आपल्या घरी स्वागत केले. तसेच सत्य समोर यावे म्हणून प्रत्येक पावलावर तपास यंत्रणांना सहाकार्य करेन, असेही ते म्हणाले.