काँग्रेसला गुजरातमध्ये मोठा धक्का, राम मंदिराचा उल्लेख करत बड्या नेत्याने सोडला पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 06:31 PM2024-03-04T18:31:24+5:302024-03-04T18:31:58+5:30
Gujarat Congress News: गेल्या काही काळात काँग्रेस पक्ष गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाला आहे. दरम्यान, राज्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पोरबंदर येथील आमदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्जुन मोढवाडिया यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या काही काळात काँग्रेस पक्ष गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाला आहे. दरम्यान, राज्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पोरबंदर येथील आमदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्जुन मोढवाडिया यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे गुजरातमधील माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या मोढवाडिया यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
पक्ष सोडताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अर्जुन मोढवाडिया म्हणतात की, प्रभू श्रीराम हे केवळ हिंदूंसाठी पूजनीय नाही आहेत. तर ते भारताची आस्था आहेत. प्राणप्रतिष्ठा समारंभाचं निमंत्रण नाकारलं गेल्याने भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. एक पक्ष म्हणून काँग्रेस जनतेच्या भावना समजून घेण्यात अपयशी ठरला आहे. या पवित्र प्रसंगावरून लक्ष विचलित करण्यासाठी राहुल गांधी यांनी आसाममध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि भारताच्या नागरिकांची आणखी निराशा झाली, असे ते म्हणाले.
दुसरीकडे काँग्रेसचे आणखी एक नेते अंबरीश डेर यांनी सोमवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आता ते मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश करतील. दरम्यान, त्यांनी राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शक्तसिंह गोहिल यांनी डेर यांना शिस्तपालन समितीने काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वापासून सहा वर्षांसाठी निलंबित केल्याचे सांगितले.