युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा झटका, स्टुडंट एक्सजेंच प्रोग्रामसाठी मान्यता नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 06:11 PM2022-08-20T18:11:32+5:302022-08-20T18:13:17+5:30
एनएमसीनं स्टुडंट एक्सचेंज मोबिलिटी प्रोग्रामला मान्यता देण्यास नकार दिला. यानंतर युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना नॅशनल मेडिकल कौन्सिलने मोठा झटका दिला आहे. नॅशनल मेडिकल कौन्सिलने (NMC) युक्रेन सरकारच्या 'मोबिलिटी प्रोग्राम'ला मान्यता न देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या चार-पाच महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी भारतात परतले आहेत.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, १ सप्टेंबरपासून सुरू होणार्या ऑटम सेमिस्टरपूर्वी (autumn semester) युक्रेनमधील विद्यापीठांकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक विशेष मोबिलिटी प्रोग्रामचा लाभ देण्यात येत आहे. या स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत भारतीय विद्यार्थी आपल्या काही सेमिस्टरचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी अन्य विद्यापीठांमध्ये जाऊ शकतात. परंतु भारताच्या नॅशनल मेडिकल कौन्सिलनं युक्रेनच्या मोबिलिटी प्रोग्रामला मान्यता देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. यामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
युक्रेनच्या विद्यापीठांकडून भारतीय विद्यार्थ्यांना पुढील सेमिस्टरच्या फी जमा करण्याचे ईमेल मिळण्यासही सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाइन क्लाससाठी परतण्याचे किंवा ऑनलाइन क्लास सुरू ठेवण्याचे पर्याय दिले जात आहेत. याशिवाय त्यांना फेब्रुवारी २०२३ च्या जवळपास सुरू होणाऱ्या पुढील सेमिस्टरच्या प्रॅक्टिकलसाठीही परतण्याचा पर्याय दिला जात आहे.
मोबिलिटी प्रोग्रामला मान्यता नाकारल्यानंतर नॅशनल मेडिकल कौन्सिलने असेही स्पष्ट केले आहे की भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये परदेशी वैद्यकीय विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा पर्याय देखील नाही. युक्रेनच्या विद्यापीठांनी या विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठांमध्ये स्थानांतरित करण्याचा पर्याय देखील दिला आहे. परंतु ज्यांचा अभ्यासक्रम १८ नोव्हेंबर २०२१ पूर्वी सुरू झाला आहे त्यांनाच याचा लाभ घेता येईल.
सुविधा केली होती बंद
नोव्हेंबर २०२१ मध्ये फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसेंटिएट (FMGL) नियमांच्या अंमलबजावणीनंतर, युक्रेनच्या विद्यापीठांनी विद्यार्थ्याना मिळणारी ही ट्रान्सफर अथवा लिव्ह सुविधा बंद केली. एफएमजीएल नियम लागू झाल्यानंतर, आता विद्यार्थ्याने ज्या विद्यापीठात प्रवेश घेतला आहे त्याच विद्यापीठात त्याच्या संपूर्ण अभ्यासक्रमादरम्यान प्रशिक्षण आणि इंटर्नशिप करू शकेल. ज्या विद्यार्थ्यांनी १८ नोव्हेंबर २०२१ नंतर त्यांच्या अभ्यासक्रमाचे पहिले सत्र सुरू केले त्यांना यापुढे ट्रान्सफर किंवा लिव्हची सुविधा दिली जाणार नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी युक्रेनलाच परतावे लागणार आहे.