Gyanvapi Case: वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली आहे. न्यायालयाने ती बाब कायम ठेवण्यायोग्य मानली आणि याच आधारावर याचिका फेटाळून लावली. ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षाच्या याचिकेवर सुनावणी होऊ नये, असा आग्रह मुस्लिम पक्षाच्या वतीने करण्यात आला होता, मात्र न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी शक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. याच कारणामुळे मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळण्यात आली आहे.
काय होती याचिका, का फेटाळली गेली?दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग महेंद्र कुमार पांडे यांच्या कोर्टात 14 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला. सुनावणीदरम्यान, मुस्लिम पक्षाने असे सांगितले की, जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात शृंगार गौरी प्रकरण हे केवळ नियमित पूजेबाबत होते, तर या प्रकरणात ते ज्ञानवापी मशिदीच्या शीर्षकाबद्दल आहे. त्यामुळेच न्यायालय हा खटला फेटाळून लावेल अशी त्यांना पूर्ण आशा होती. मात्र सध्या न्यायालय या प्रकरणी पुढील सुनावणी करणार आहे.
हिंदू पक्षाचे वकील अनुपम दिवेदी यांनी मीडियाला सांगितले की, या प्रकरणी सुनावणी सुरू होईल आणि पुढील तारीख 2 डिसेंबर ठेवण्यात आली आहे. विश्व वैदिक सनातन संघाचे कार्याध्यक्ष संतोष सिंह म्हणाले की, हा आमचा मोठा विजय आहे, आता सुनावणीनंतर आमच्या मागण्याही मान्य होतील, हीच अपेक्षा आहे.
हिंदू पक्षाची मागणी काय आहे?सुनावणीदरम्यान हिंदू पक्षाने चार प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. त्या मागण्यांमध्ये भगवान आदि विश्वेश्वर शंभू विराजमान यांची नियमित पूजा त्वरित प्रभावाने सुरू करावी, संपूर्ण ज्ञानवापी संकुलात मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालावी, संपूर्ण ज्ञानवापी संकुल हिंदूंना द्यावे, मंदिरावरील वादग्रस्त बांधकाम हटवावे. आता या मागण्या मान्य होतात की नाही, हे येत्या काही दिवसांतील सुनावणीनंतर स्पष्ट होईल, मात्र आता न्यायालय या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. ही हिंदू बाजूसाठी दिलासादायक बाब आहे.