नवी दिल्ली - भारतातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस(Infosys) नं इंटरनॅशनल फ्रेशर एसेसमेंट(FA) परीक्षा पास करण्यात अयशस्वी झालेल्या शेकडो नव्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं आहे. बिझनेस टूडेच्या रिपोर्टनुसार, कंपनीनं फ्रेशर्ससाठी एक एसेसमेंट टेस्ट ठेवली होती. ज्यात उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले. आर्थिक मंदी(Economic Recession) यामुळे जगातील बहुतांश कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. त्यात दिग्गज कंपन्या कॉस्ट कटिंगसाठी वर्क फोर्स कमी करत आहेत.
केवळ ६० लोक पासऑगस्ट २०२२ मध्ये कंपनीत सहभागी झालेल्या एका फ्रेशरनं सांगितले की, मागील वर्षी ऑगस्टमध्ये मी इन्फोसिस कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. मला SAP, ABAP स्ट्रीमनं ट्रेनिंग देण्यात आली होती. माझ्या टीमच्या १५० लोकांपैकी केवळ ६० लोक फ्रेशर एसेसमेंट परीक्षेत पास झाले. बाकी आम्हा सर्वांना २ आठवड्यांपूर्वी नोकरीवरून काढून टाकले.
मागील बॅच जी जुलै २०२२ मध्ये कामावर ठेवली होती त्यात १५० फ्रेशर्स होते. त्यातील जवळपास ८५ फ्रेशर्स टेस्टमध्ये अपयशी ठरले. त्यांना नोकरीवरून काढण्यात आले होते. कंपनीने एसेसमेंट टेस्ट पास न केलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इंटरनल टेस्ट फेल झालेल्या ६०० कर्मचाऱ्यांना इंफोसिस कंपनीनं नोकरीवरून काढले आहे. २ आठवड्यांपूर्वी फ्रेशर एसेसमेंट टेस्ट अपयशी झालेले २०८ जणांना नोकरीवरून काढले. मागील काही महिन्यात एकूण ६०० फ्रेशर्सला नोकरीवरून काढले आहे.
नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येची पुष्टी करण्यासाठी इन्फोसिसला संपर्क केला होता परंतु कंपनीने त्याचा खुलासा करण्यास नकार दिला असं बिझनेड टूडेत म्हटलं आहे. तर इंटरनल टेस्ट अयशस्वी ठरल्यास कर्मचाऱ्यांना नेहमी नोकरीवरून काढले जाते असा कंपनीतील एका प्रतिनिधीने दावा केला. विशेष म्हणजे हे वृत्त अशावेळी आले आहे जेव्हा शेकडो फ्रेशर्स ऑफर लेटर मिळाल्यानंतर ८ महिन्याहून अधिक काळ कंपनीत ऑनबोर्ड होण्याची प्रतिक्षा करत आहेत.
यातील एका फ्रेशर्सने प्रतिक्रिया दिली की, भलेही माझ्याकडे भारतातील टॉप आयटी कंपनी इन्फोसिसमधून नोकरीची ऑफर आहे. परंतु माझे भविष्य मला असुरक्षित वाटतेय. दिर्घकाळ प्रतिक्षेमुळे माझ्या बायोडेटामध्ये १ वर्षाचा गॅप पडला आणि मला वेतनही नाही. इन्फोसिसनं काहीही स्पष्ट केले नाही. आता माझ्या मित्रांना जे माझ्या आधी ऑनबोर्ड झालेत त्यांना काढून टाकण्यात आले. आयटी क्षेत्रात नोकऱ्या खूप असतात असं मला वाटायचं परंतु आता हे चित्र बदललंय त्यामुळे भीती वाटते असं उमेदवारानं म्हटलं.