लॉकडाऊनंतर पहिल्यांदाच नवी दिल्लीची चाके तीन दिवसांसाठी थांबणार आहेत. सात सप्टेंबरला मध्यरात्री १२ वाजल्यापासून नवी दिल्लीतील वाहतूक बंद केली जाणार आहे. यासाठी शाळा, कार्यालये आदी बंद ठेवण्यात येणार आहेत. दिल्लीत जी-२० शिखर परिषद होणार आहे. यासाठी ८, ९ आणि १० सप्टेंबरला दिल्लीतील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
ट्रॅफिकवरून दिल्लीच्या लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे. कोणते रस्ते खुले असतील, लोक ये-जा करू शकणार की नाही, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. वाहतुक पोलिसांनुसार लोकांच्या प्रवासावर तेवढा प्रभाव पडणार नाही. कारण शाळा, कॉलेज आणि कार्यालये या तीन दिवस बंद ठेवली जाणार आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ही सुट्टी असणार आहे. नवी दिल्ली वगळता इतर ठिकाणी वाहतुकीची समस्या नसणार आहे.
व्हीआयपी ये-जा करत असताना वाहतूक वळविली जाईल. इतर ठिकाणी सर्व रस्ते बंद ठेवले जाणार नाहीत. यामुळे लोक पर्यायी मार्गाद्वारे वाहतूक करू शकणार आहेत. G-20 शिखर परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्थापन आराखड्यानुसार, 7 तारखेच्या मध्यरात्री 12 पासून, नवी दिल्ली परिसर आणि इतर प्रतिबंधित किंवा सुरक्षा घेरलेल्या ठिकाणांभोवती वाहतूक नियम लागू केले जातील.
या तीन दिवसांत दिल्लीच्या सीमांवरून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, रेशनच्या वस्तू, औषधे आणि पेट्रोलियम पदार्थ इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकनाच प्रवेश दिला जाईल. तसेच जी वाहने दिल्लीच्या आत आहेत त्यांना दिल्लीबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. नवी दिल्ली परिसरात मोठ्या प्रमाणावर व्हीआयपी मुव्हमेंट होणार असून, या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील सर्व कार्यालये, मॉल्स आणि बाजारपेठा 8 ते 10 तारखेपर्यंत बंद राहतील.
गाझीपूर, सराय काले खान आणि आनंद विहार येथेही आंतरराज्यीय बसेस थांबविल्या जाणार आहेत. गुडगावकडून येणाऱ्या हरियाणा आणि राजस्थानच्या आंतरराज्यीय बसेसही राजोकरी सीमेवर थांबवल्या जातील किंवा तेथून मेहरौलीच्या दिशेने पाठवल्या जातील. फक्त मेट्रो सेवा सुरू राहणार आहे.