लघुशंका करणाऱ्याच्या घरावर फिरवला बुलडोझर; देशभरात तीव्र संताप, रात्री उशिरा अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 08:45 AM2023-07-06T08:45:11+5:302023-07-06T08:45:23+5:30
प्रवेशचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला. तो १० दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिधी (मध्य प्रदेश) : मद्यधुंद अवस्थेत एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका केलेला भाजप कार्यकर्ता प्रवेश शुक्ला याला मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याच्यावर एनएसए लावण्यात आला आहे. दरम्यान, त्याच्या घरावर सरकारने बुलडोझर चालवला आहे. या प्रकरणामुळे भाजपवर देशभरातील विरोधी पक्षांनी टीकास्त्र सोडले आहे.
प्रवेशचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला. तो १० दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी हा सिधी जिल्ह्यातील भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांचा प्रतिनिधी आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीडी शर्मा यांनी या घटनेबाबत आदिवासी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष रामलाल रौतेल यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती चौकशी करून आपला अहवाल भाजप प्रदेशाध्यक्षांना सादर करणार आहे.
फाशी देण्याची मागणी
लघुशंका केल्याच्या घटनेवरून बुधवारी इंदूरमधील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर दलित आणि आदिवासींनी निदर्शने केली. राज्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार वाढत असल्याचा आरोप करणारे फलक हातात घेऊन आंदोलकांनी घोषणाबाजी केली. फेडरेशनचे अध्यक्ष मनोज परमार यांनी म्हटले की, आदिवासी तरुणावर लघुशंका करून संपूर्ण देशाला लाज आणली आहे. शुक्ला याला फाशी द्यावी.
संबंधितावर एनएसए तसेच बुलडोझरही चालवला आहे. गरज पडली तर गुन्हेगारांना १० फूट जमिनीखालीही गाडले जाईल.
- शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
भाजपच्या राजवटीत आदिवासी बांधवांवर अत्याचार वाढत आहेत. या अमानवी कृत्याने संपूर्ण मानवतेला लाज वाटली आहे. भाजपच्या द्वेषाचा हा घृणास्पद चेहरा समोर आला आहे.- राहुल गांधी, काँग्रेस नेते