नवी दिल्ली - माणसांनी सिमेंटची जंगलं वाढवल्याने वन्य प्राणी माणसांच्या वस्तीत, मानवी रहिवाशी परिसरात येत असल्याचं आढळून येत आहे. कधीकाळी जंगलात दिसणारा बिबट्या आता कुणाच्या शेतात, कुणाच्या गावात, कुणाच्या वस्तीत आढळून आल्याच्या बातम्या अनेकदा माध्यमातून समोर आल्या आहेत. त्यामुळे, बिबट्या आढळून येणं ही नवीन घटना राहिलीच नाही. तर, काहीवेळा मानवी वस्तीत दहशत पसरवणाऱ्या बिबट्यांना वन विभागाने पकडूनही नेल्याचे प्रसंग घडले आहेत. मात्र, दिल्लीतील एका महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पण, तपासणीअंती तो चित्ता असल्याचे निष्पण्ण झाले.
जंगलातील वन्य प्राण्यांपैकी एक असलेला चित्ता हा भारतात अतिशय दुर्मिळ प्राणी मानला जातो. म्हणूनच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधता द. आफ्रिकेच्या नामीबियातून भारतात चित्ते आणण्यात आले होते भारता आणण्यात आलेल्या चित्त्यापैकी ८ चित्त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मात्र, आता राजधानी दिल्लीजवळील एका महामार्गावर वाहनाच्या धडकेत चित्ता ठार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक फोन आला. त्यानुसार, येथील महामार्गावर बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर, पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
अलीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खातुश्याम मंदिराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर हा चित्ता मृतावस्थेत पडला होता. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, तो बिबट्या नसून चित्ता असल्याचे लक्षात आले असून बॉडी ताब्यात घेतली. तसेच, संबंधित वन विभागालाही पाचारण करण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू झाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तो बिबट्या नसून जॅग्वार म्हणजेच चित्ता असल्याचं उघडकीस आलं आहे. मात्र, चित्ता हा भारतात दुर्मिळ असतानाही येथील भागात कुठून आला आणि इथपर्यंत कसा पोहोचला याची चर्चा होत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात १२ चित्ते आणण्यात आले होते. त्यापैकी ८ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.
मध्य प्रदेशात कुनो पार्कमधील चित्ता प्रोजेक्ट हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून नामीबियातून आण्यात आलेल्या चित्त्यांना याच पार्कमध्ये सोडून देण्यात आले होते. १७ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नामीबियातून आणलेल्या चित्त्यांना याच कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडलं होतं.