चंदीगड : हरियाणातील गुरूग्राम येथे राहणाऱ्या एका महिलेने व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तीला अटक केली. मात्र, काही दिवसांनी महिलेने दुसऱ्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्या आरोपीचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली. अशाप्रकारे महिलेने एकामागून एक अशा 9 पुरुषांना लक्ष्य केले. तिने बलात्काराचे आरोप केले आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे वसुल केले. तपासानंतर पोलिसांनी महिलेविरुद्ध कागदपत्रे गोळा करून तिची कारागृहात रवानगी केली. या महिलेने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही महिलेचा प्रताप पाहून आश्चर्य व्यक्त केले आणि जामीन अर्ज फेटाळला.
उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वकिलांनी महिलेविरुद्ध कागदपत्रे दाखल केली. ही महिला खोटे आरोप करून खंडणीचे रॅकेट चालवते, अशी माहिती मिळाली. उच्च न्यायालयाने प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेतली. त्यानुसार न्यायालयाने म्हटले, कथित गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन असे समोर आले की याचिकाकर्त्याला विविध व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंदवण्याची सवय आहे. त्यामुळे महिलेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. ही महिला 27 जानेवारी 2022 पासून तुरुंगात आहे.
महिलेचा 'असा' झाला पर्दाफाशमहिलेचा पर्दाफाश तेव्हा झाला जेव्हा एका व्यक्तीच्या आईने तिच्याविरूद्ध तक्रार नोंदवली. "एका महिलेने माझ्या मुलाला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. महिलेची माझ्या मुलाशी मैत्री आहे", असे महिलेने पोलिसांना सांगितले. संबंधित महिला त्याच्यासोबत फिरायची. डेटवर जायची याशिवाय दोघांनी संमतीने शारीरिक संबंध देखील ठेवले. त्यानंतर महिलेने त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैसे उकळले. तिने आणखी पैसे मागितल्यावर मुलगा घाबरला, त्यानंतर मुलाच्या आईने महिलेविरोधात तक्रार दाखल केली.
1 वर्षात 9 जणांच्या प्रेमात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणांना आपल्या जाळ्यात फसवणारी महिला एका वर्षात 9 जणांच्या प्रेमात पडली आहे. सप्टेंबर 2020 ते नोव्हेंबर 2021 दरम्यान याचिकाकर्त्याने 9 एफआयआर दाखल केले होते. तिचा बलात्कार, लैंगिक अत्याचार इत्यादी गुन्ह्यांमध्ये पुरुष आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अडकवण्याचा पॅटर्नच आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"