१३ वर्षांच्या कार्तिकने बनवले ध्वनिचित्र वृत्तपत्र; बातमी क्लिक हाेताच कृत्रिम बुद्धिमत्तेचा अँकर करतो वाचन
झज्जर :
गरज ही शोधाची जननी म्हटली जाते. हरयाणातील झज्जर जिल्ह्यातील झांसवा गावातील १३ वर्षांच्या कार्तिकनेही आपल्या अनोख्या शोधाद्वारे ते सिद्ध केले. त्याची आई अशिक्षित असल्याने तिला बातम्या वाचता येण्याचा प्रश्नच नव्हता. या समस्येवर उपाय म्हणून कार्तिकने असे ध्वनिचित्र (ऑडिओ व्हिज्युअल) वृत्तपत्र बनविले, ज्यावर बातमी क्लिक होताच कृत्रिम बुद्धिमत्तेवाला (एआय) अँकर ते वाचून काढतो.
या बातमीशी संबंधित व्हिडीओही एकाचवेळी पाहता येतील. कार्तिक नुसता शोध लावून थांबला नाही, तर त्याचे पेटंटही त्याने नोंदविले आहेत. २५ एप्रिल रोजी त्याच्या आईच्या हस्ते या वृत्तपत्राचे प्रकाशन होणार आहे. या पेपरला श्रीकुंज असे नाव देण्यात आले आहे.
वृद्ध, अशिक्षित, दृष्टिहिनांनाही फायदा तूर्तास तो साप्ताहिक काढणार आहे. त्यात आठवड्यातील माहिती आणि मनोरंजक बातम्या असतील. कार्तिकने सांगितले की, या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तो एआयशी कोणताही ई-पेपर जोडून ऑडिओ व्हिज्युअल बनवू शकतो. परंतु सध्या तो फक्त त्याच्या श्रीकुंज या वृत्तपत्रावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. कार्तिकच्या म्हणण्यानुसार, वृद्ध आणि अशिक्षित लोकांशिवाय अंध लोकांनाही याचा लाभ मिळणार आहे.
आई-वडिलांना कौतुकवडील अजित सिंग हे दहावी पास असून, शेती करतात. आई सुशीला या गृहिणी असून, त्यांनाही मुलाचे खूप कौतुक आहे. कार्तिकच्या कौशल्यावर खुश होऊन राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी कार्तिकला लॅपटॉप भेट दिला होता. त्याच्या मदतीने कार्तिकने वृत्तपत्र तयार केले.
कार्तिकची अफाट कामगिरीकार्तिकने वयाच्या ११ व्या वर्षी ३ ॲप्स बनविले होते. हे तिन्ही ॲप अभ्यासाशी संबंधित आहेत. त्याने कोडिंग वर्ल्ड आणि द वर्ल्ड ऑफ ग्राफिक डिझायनिंग ही दोन पुस्तकेही लिहिली आहेत. गेल्या वर्षी गिनीज बुकने त्याला आशियातील सर्वात तरुण ॲप डेव्हलपर म्हणून स्थान दिले होते.