लोक आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत असतात. मग तो वाढदिवस लग्नाचा का असेना. या दिवशी जोडप्याला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दिल्या जातात. पती-पत्नी एकमेकांना भेटवस्तू देतात तसेच या दिवशी काही वचनही देत असतात. दरम्यान, छत्तीसगडमधील मुंगेरी जिल्ह्यातील लोर्मी येथून एक अशी एक घटना समोर आली आहे, जी ऐकून सर्वचजण या जोडप्याचे कौतुक करत आहे.
दरम्यान, लोर्मी येथील एका शिक्षक दाम्पत्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. लोर्मी येथील रहिवासी असलेले शिक्षक दाम्पत्य शरद कुमार दडसेना आणि त्यांची पत्नी लता दडसेना यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी इस्पितळ गाठून नेत्र विभागात जाऊन आवश्यक कागदपत्रे सुपुर्द केली. यावेळी शिक्षक दाम्पत्याचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.
शिक्षक दाम्पत्याने ठेवला आदर्श शिक्षक दाम्पत्याच्या नेत्रदानाच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी शरद दडसेना यांनी सांगितले की, आपल्या डोळ्यांमुळे इतरांनाही हे जग पाहता यावे, या उद्देशाने आम्ही पती-पत्नीने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. या नेत्रदान मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करतो. डेव्हलपमेंट ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ.जी.एस.डाऊ यांनी सांगितले की, लोर्मी विधानसभेतील आतापर्यंत तीन जणांनी अवयवदान केले आहे.