शायरीमधून आपल्या मृत्यूचं भाकित करणाऱ्या तरुणाचा दुसऱ्याच दिवशी धक्कादायक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील रीवा येथे घडली आहे. येथील शिवम पांडेय या तरुणाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करत आपल्या मृत्यूचे संकेत दिले होते. दुसऱ्याच दिवशी या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे शिवमला त्याच्या मृत्यूची चाहूल कालही होती का, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. तसेच जे शब्द त्याने शायरीमधून काढले होते. ते प्रत्यक्षात उतरले. या तरुणाने व्हिडीओ बनवून शायरीमधून दिलेल्या मृत्यूच्या संकेतांची आता चर्चा होत आहे.
शिवमच्या मित्रांनी सांगितले की, त्याने एका दिवसापूर्वी गमती गमतीमध्ये ही शायरी ऐकवली होती. त्यादरम्यान कुणीतरी त्याचा हा व्हिडीओ मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केला. व्हिडीओमध्ये शिवम म्हणाला होता की, तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे. मैं एक शाम चुरा लूं मगर तुम्हें बुरा ना लगे. तुम्हारे बस में हो तो भूल जाना मुझे, तुम्हें भुलाने में शायद मुझे जमाना लगे, असे उदगार त्याने काढले होते.
शिवम पांडेचा एवढ्या कमी वयात अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. शिवमच्या शायरीचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. त्यामधील त्याचे शब्द लोकांना भावूक करत आहेत.
रिवा जिल्ह्यातील पिपरवार गावातील शिवम पांडे उर्फ सोनू हा अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शिवमच्या कुटुंबात आई, भाऊ आणि बहीण असे सदस्य आहेत. त्याच्या वडिलांचा आधीच मृत्यू झाला होता.