नवी दिल्ली : लोकसभेच्या नैतिकता समितीचे अध्यक्ष विनोद कुमार सोनकर यांनी तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरील समितीचा अहवाल अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात सादर केला, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली. दिवाळीनंतर बिर्ला त्यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. समितीने गुरुवारी झालेल्या बैठकीत, मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याबद्दल मोईत्रा यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा अहवाल बहुमताने स्वीकारला होता. समितीने अनैतिक वर्तन आणि सभागृहाचा अवमान केल्याबद्दल मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची शिफारस केली होती. बिर्ला हे सध्या कोटा येथे आहेत आणि दिवाळीनंतर (१२ नोव्हेंबर) ते नवी दिल्लीत परतण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांनी या अहवालावर कारवाई करणे अपेक्षित आहे.
मी परत येईन, दुप्पट मताधिक्य घेऊन...हकालपट्टी करण्याची शिफारस केल्याच्या एका दिवसानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोईत्रा यांनी शुक्रवारी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण दुप्पट मताधिक्य मिळवून परत येऊत, असे सांगत एक प्रकारे या प्रकरणामुळे आपल्याला फायदाच होईल, असे सुचवले असे मानले जाते. ‘संसदीय इतिहासात प्रथमच नैतिकता समितीने अनैतिकरीत्या हकालपट्टी केलेली व्यक्ती म्हणून आपली इतिहासात नोंद होईल याचा अभिमान वाटतो. नैतिकता समितीच्या आदेशात हकालपट्टीचा समावेश नाही. प्रथम हकालपट्टीची शिफारस केली आणि नंतर सरकारला सीबीआयला पुरावे शोधण्यास सांगितले,’ असे मोईत्रा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.