चेन्नई – अनेकदा आपण बँकांकडून होणाऱ्या चुकीच्या व्यवहाराच्या बातम्या ऐकतो. कधी महिलेच्या खात्यावर लाखो रुपये क्रेडिट होतात तर कधी मजुराच्या बँक खात्यात २०० कोटी जमा होतात परंतु चेन्नईमध्ये घडलेल्या एका प्रकाराने बँकेकडून झालेल्या चुकीच्या व्यवहाराचा आकडा पाहून तुमचे डोळे दिपतील. तामिळनाडूमधील एका कार ड्रायव्हरच्या खात्यात १००, २०० कोटी नव्हे तर तब्बल ९००० कोटी रुपये जमा झाले आणि काही क्षणासाठी तो राजा झाला.
ड्रायव्हर बँकेकडून आलेला मेसेज पाहून विश्वास बसला नाही. त्याने या खात्यातील २१ हजार रुपये मित्राच्या अकाऊंटवर ट्रान्सफर केले. तेव्हा त्याचा विश्वास बसला. परंतु त्याचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. बँकेने त्याच्या खात्यावर चुकीने पाठवलेली रक्कम पुन्हा कापली. पलानी इथं हा कार ड्रायव्हर राहायला आहे. तो कोडंबक्कम येथे मित्रांसोबत राहतो आणि कार चालवून उदरनिर्वाह करतो. ९ सप्टेंबरला राजकुमारच्या खात्यावर बँकेचा मेसेज आला. हा मेसेज पाहून सुरुवातीला त्याला धक्का बसला. त्याच्या खात्यावर ९ हजार कोटी जमा झाल्याने तो हैराण झाला.
राजकुमारचे तामिळनाडू मर्केटाईल बँकेत खाते आहे. त्याच्या खात्यात केवळ १०५ रुपये होते. अशावेळी त्याच्या खात्यात ९ हजार कोटी जमा झाल्याचा मेसेज पाहिला तेव्हा त्याला कुणीतरी त्याला मुर्ख बनवतंय असा त्याचा समज झाला. बँकेतील जमा पैशांवर विश्वास नसल्याने त्याला आधी २१ हजार रुपये मित्राला पाठवले. हे पैसे मित्राला मिळाल्याची त्याच्याकडून खातरजमा केली त्यावेळी त्याला विश्वास बसला.
दरम्यान, थोड्या वेळाने बँक अधिकाऱ्यांनी कार ड्रायव्हर राजकुमारशी संपर्क साधला आणि त्याच्या खात्यात बँकेच्या चुकीमुळे इतकी मोठी रक्कम जमा झाली असल्याचे सांगितले. हे पैसे कुणालाही ट्रान्सफर करू नका असंही बँकेने त्यांना बजावले. काही वेळाने बँकेने राजकुमारच्या खात्यात जमा झालेले ९ हजार कोटी पुन्हा डेबिट केले. त्याचसोबत बँक मॅनेजरने राजकुमारला मित्राकडून २१ हजार परत करून देण्याची सूचना केली. कारण हे सर्व पैसे बँकेने त्यांच्या चुकीच्या व्यवहारामुळे राजकुमारच्या खात्यात टाकले होते.