संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये जागा कमी होण्याची शक्यता असल्याने भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश आणि तेलंगणामध्ये अधिक जागा जिंकण्यासाठी आपली ताकद वाढवली आहे. अब की बार ३७० पार आणि एनडीए के साथ ४०० पार असा नारा देणाऱ्या भाजपला वास्तवाचा सामना करावा लागत आहे.
२०१९ च्या तुलनेत यावेळी कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांतील जागा कमी झाल्या तर भाजप याची भरपाई उत्तर प्रदेश आणि तेलंगणासारख्या राज्यात करणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातून ८० पैकी ६२ जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र, यंदा ८० पैकी ८० जागा जिंकण्यासाठी पक्षाने पूर्ण ताकद लावली आहे. यावेळी बसपाचे उमेदवार अनेक ठिकाणी भाजपचे गणित बिघडवू शकतात. तरीही भाजपला असा विश्वास आहे की, त्यांचे ७० हून अधिक उमेदवार विजयी होऊ शकतात. पश्चिम बंगालमध्ये २०१९ मध्ये भाजपने ४२ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. यावेळी या राज्यात नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अंतर्गत सर्वेक्षणात काय?- कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार, बंगालमधील आकडेवारीनुसार आणि अंतर्गत सर्वेक्षणात जागा कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. २०१९ मध्ये भाजपने महाराष्ट्रात २३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) सोबत असूनही साशंकता आहे. कर्नाटकमध्ये गत निवडणुकीत भाजपने राज्यातील २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. - यावेळी कर्नाटकात अर्ध्या जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ही भरपाई करण्यासाठी भाजपने तेलंगणात खूप ताकद लावली आहे. २०१९ मध्ये भाजपने तेलंगणात १७ पैकी तीन जागा जिंकल्या होत्या. यावेळी या राज्यात अधिक जागा जिंकू असा दावा भाजपने केला आहे.
येथेही धक्का?हरयाणा, राजस्थान, पंजाब, दिल्ली या राज्यांमध्ये भाजपला थोडासा धक्का बसू शकतो. या सर्वांची भरपाई करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतात अधिक मेहनत घेतली आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांकडून काही भरपाई शक्य आहे.