ज्या धर्मात समानता नाही तो आजार; उदयनिधींपाठोपाठ मंत्री प्रियांक खरगे यांचेही वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 11:47 AM2023-09-05T11:47:07+5:302023-09-05T11:47:14+5:30
दरम्यान, भाजपनेही खरगेेंवर टीका केली आहे.
चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात देशभरात गदारोळ सुरू असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि मंत्री प्रियांक खरगे यांनी उदय स्टॅलिन यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. मंत्री प्रियांक खर्गे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘कोणताही धर्म जो समानतेचा पुरस्कार करत नाही किंवा तुम्हाला माणूस म्हणून सन्मान मिळेल याची खात्री देत नाही, तो माझ्या मते आजार आहे.’ दरम्यान, भाजपनेही खरगेेंवर टीका केली आहे.
शिरच्छेद करणाऱ्याला १० कोटींचे बक्षीस
अयोध्येतील संत परमहंस आचार्य यांनी सोमवारी उदयनिधी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत ‘जो कोणी उदयनिधी यांचा शिरच्छेद करून आणेल, त्याला १० कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल,’ अशी घोषणा केली. यावेळी त्यांनी उदयनिधींच्या पोस्टरवर तलवारही चालवली.
‘आम्ही प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करतो’
सोमवारी काँग्रेसतर्फे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल उदयनिधी यांच्या वक्तव्यावर म्हणाले की, ‘आम्ही सर्वधर्म समभावावर विश्वास ठेवतो आणि आम्ही त्यांचा आदर करतो.आमचा दृष्टिकोन स्पष्ट आहे; ‘सर्वधर्म समभाव’ ही काँग्रेसची विचारधारा आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करतो.’
उदयनिधी वक्तव्यावर ठाम
उदयनिधी आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. रविवारी संध्याकाळीही त्यांनी सनातन धर्म नष्ट करण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. चेन्नईत पत्रकारांशी बोलताना उदयनिधी म्हणाले, ‘लोकांनी अनावश्यकपणे माझ्या वक्तव्याला नरसंहाराशी जोडले. पंतप्रधान काँग्रेसमुक्त भारताची चर्चा करतात, म्हणजे काँग्रेसवाल्यांना मारायचे का ? असे ते म्हणाले. काही लोक द्रविडमलाही संपविण्याची चर्चा करतात. याचा अर्थ द्रमुकच्या लोकांनाही मारले पाहिजे का ?’