सोशल मीडियावरील पोस्टवरून वाद, भर वर्गात घुसून विद्यार्थी आणि शिक्षकावर चाकूहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 04:00 PM2024-07-30T16:00:00+5:302024-07-30T16:00:28+5:30
Kerala Crime News: केरळमधील त्रिची येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील श्रीरंगम बॉईज हायर सेकंडरी स्कूल येथे एका सोशल मीडिया पोस्टवरून एका विद्यार्थ्याने भर वर्गात शिरून एक विद्यार्थी आणि शिक्षकांवर चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे.
केरळमधील त्रिची येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील श्रीरंगम बॉईज हायर सेकंडरी स्कूल येथे एका सोशल मीडिया पोस्टवरून एका विद्यार्थ्याने भर वर्गात शिरून एक विद्यार्थी आणि शिक्षकांवर चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. या घटनेत विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर विद्यार्थी अचानक वर्गात घुसला. तिथे शिक्षक शिव कुमार हे अकाऊंट्स विषय शिकवत होते. या विद्यार्थ्याने वर्गात घुसल्यावर एका विद्यार्थ्याचं नाव घेतलं. त्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला केला. दुसऱ्या विद्यार्थ्याने हा हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर आरोपी विद्यार्थ्याने वळून पुन्हा त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर वार केले आणि पळून गेला. दरम्यान, दोन्ही जखमींना त्वरित श्रीरंगम सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शिक्षक शिवकुमार यांनी सांगितलं की, मी ३० वर्षांपासून सेवेत आहे. वर्गात आठवा तास सुरू होता. मागच्या काही दिवसांपासून विज्ञान शाखेचा गट आणि कला शाखेचा विद्यार्थ्यांचा गट यांच्यात काही वाद सुरू होता. या वादाबाबत मला फारशी माहिती नव्हती. दरम्यान, एक विद्यार्थी वर्गात आला. त्याने गणवेश आणि मास्क घातलेला नव्हता. मी त्याला काय हव आहे, असं विचारलं. तेव्हा त्याने एका विद्यार्थ्याचं नाव घेतलं. त्यानंतर त्याने चाकू बाहेर काढला आणि त्या विद्यार्थ्यावर वार केले. त्यानंतर तो माझ्या दिशेने वळला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. कदाचित मी त्याला पकडेन अशी भीती त्याला वाटत होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.